scorecardresearch

बाळासाहेब जेव्हा जाहीर सभेदरम्यान राज ठाकरेंना म्हणाले होते, “तू बोलतोस की मी जाहीर करू….”

“तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमत होत नव्हती.” राज ठाकरेंनी पुण्यातील कार्यक्रमात स्वतः सांगितली ती आठवण.

बाळासाहेब जेव्हा जाहीर सभेदरम्यान राज ठाकरेंना म्हणाले होते, “तू बोलतोस की मी जाहीर करू….”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (शनिवार) पुण्यात कार्यक्रमानिमित्त आले आहेत, यावेळी बोलताना त्यांनी आपल्या पहिल्या भाषणाचा किस्सा उपस्थितांना सांगितला. ते म्हणाले की, “१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरले होते. मी बाळासाहेबांच्या बाजूला बसलो होतो. अनेक नेते मंडळी देखील उपस्थित होते. तेवढ्यात बाळासाहेब म्हणाले, तू बोलणार आहेस ना(आम्ही आरे तुरे मध्ये बोलायचो) मी म्हटले तू काहीतरी बोलू नकोस हा…. नाही तर मी व्यासपीठावरून निघून जाईल. त्यावर बाळासाहेब म्हणाले, नाही नाही तू आज बोललंच पाहीजे. हे सर्व आम्हा दोघांचे सुरू असताना बाळासाहेब एकदम म्हणाले तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू. अशाप्रकारे इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमत होत नव्हती. मी कधी बोलू शकेल आणि भाषण करू शकेल. यावर माझा कधीच विश्वास देखील नव्हता.” राज ठाकरेंनी सांगितलेल्या या आठवणीवर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजून दाद दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात शिवशाहीर करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अंतिम सोहोळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मनसे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “दुपारचे दोन वाजले आहेत. सकाळ पासून ही वक्तृत्व स्पर्धा सुरू आहे.त्यामुळे अनेकांच्या पोटात बहुदा वक्तृत्व वक्तृत्व असे आवाज येत असतील. पण आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त शहरातील स्थानिक नेत्यांनी स्पर्धा घेण्याचे ठरविले. त्याचा कार्यक्रम होत आहे. बाबासाहेब म्हटल्यानंतर शिवराय ही गोष्ट आलीच, त्या पार्श्वभूमीवर शिवराय यांच्यावर दोन विषय घेऊन, वक्तृत्व स्पर्धा घेतली गेली आहे. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेतून वक्ते तयार होणे आज महत्वाची गोष्ट आहे. आता मी चार-पाच जणांची भाषणे ऐकली. त्या सर्वांचा मला हेवाच वाटतो. मी माझ्या शालेय जीवनात कधी वक्तृत्व स्पर्धेत कधी भागच नाही घेतला. भीती वाटायची, बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायच कसं, बोलायाचे कसे आणि जे बोलू शकतात त्यांच्याबद्दल मला नेहमी कुतहूल वाटायचे.” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, “मी आजवर वक्ते ऐकले आहेत. घरात तर माननीय बाळासाहेब होतेच, तसेच मी श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी असे अनेक वक्ते मी जवळून पाहिले आणि ऐकले देखील आहेत. पण हे लहानपणापासून बघत असताना. मी कधीतरी बोलेल, असं मला कधीच वाटलं नव्हते.” .

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या