महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रचाराची पहिली सभा पुण्यात सोमवारी (३१ मार्च) होत आहे. ठाकरे यांची दुसरी सभा ६ एप्रिल रोजी होईल.
गुढीपाडव्याच्या दिवशी होणार असलेल्या प्रचारसभेत मनसेचे राज्यातील सर्व उमेदवार उपस्थित राहणार असून नदीपात्रात सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दुसऱ्या टप्प्यातील जाहीर सभा ६ एप्रिल रोजी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात येरवडय़ातील मोझे विद्यालय येथे सायंकाळी सात वाजता होईल.
पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी शनिवारी सकाळी खडकी बाजार, बोपोडी, रेंजहिल्स भागात तसेच घोरपडी, बी. टी. कवडे पथ, वानवडी येथे सायंकाळी पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. नगरसेवक बाळा शेडगे, बाबू वागसकर, अजय तायडे, नाना भानगिरे, राजू पवार, नीलम कुलकर्णी तसेच रणजित शिरोळे, अशोक मेहेंदळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पायगुडे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे यावेळी पहायला मिळाले. महिला ठिकठिकाणी औक्षण करत होत्या तसेच युवकांकडून जोरदार घोषणा देत पायगुडे यांचे स्वागत केले जात होते.