इतिहासाने भारतीय मुसलमानांचे आणि विशेषत: मराठी मुसलमानांचे नुकसान केले आहे. मुसलमान वैर कायम ठेवले तरच सामाजिक सत्ता कायम ठेवता येते अशी हिंदूुत्ववाद्यांची धारणा आहे. त्यामुळे मुस्लिमांनी अभ्यासाचे अवलंबित्व संपवून इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये काम करावे, अशी सूचना प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांनी केली.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मुस्लीम समाजासमोरील आव्हाने’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचा समारोप राजन खान यांच्या भाषणाने झाला. मंडळाचे अध्यक्ष हुसेन जमादार, कार्याध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी आणि माजी अध्यक्ष सय्यदभाई या वेळी उपस्थित होते.
राजन खान म्हणाले, या देशातील डावी चळवळ पुन्हा-पुन्हा हारत असून हिंसात्मक उजवा विचार शिरजोर होत आहे. हिंदूुत्ववाद भाजून खाण्यासाठीच मुसलमान हा शब्द वापरला गेला. मुसलमान बौद्धिकदृष्टय़ा विकसित होण्यास तयार नाही. सावित्रीबाई फुले यांच्याबरोबरीने शिक्षणामध्ये काम करणाऱ्या फातीमा बीबी यांचे चरित्र स्वातंत्र्यानंतरही कोणाला लिहावेसे वाटले नाही. हे अभ्यासाचे अवलंबित्व संपवून इतिहास लेखनामध्यये मुस्लिमांनी काम करण्याची आवश्यकता आहे. तलाकपीडित महिलांना रोजगार मिळवून देत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. संगीत, साहित्य, क्रीडा, राजकारण, विज्ञान अशा सर्वच क्षेत्रात िहदूंच्या बरोबरीने मुसलमान व्यक्तींनी योगदान दिले आहे. या योगदानाविषयीचे लेखन झाले पाहिजे.
मुसलमानांनी कुराण वाचले पाहिजे. त्यांना कुराण कळले तर जगात शांतता नांदेल. मशिदीवरचे ध्वनिवर्धक भोंगे हटविले पाहिजेत. अल्लाच्या अजानचा आवाज आतून आला पाहिजे, असेही राजन खान यांनी सांगितले.
भारताच्या राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य दिले आहे. धर्माचे स्वातंत्र्य दिले नाही, याकडे शमसुद्दीन तांबोळी यांनी लक्ष वेधले.