आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमधील रुग्णांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना असूनही हृदयशस्त्रक्रिया करायला सांगितलेल्या बालरुग्णांना त्याचा फारसा फायदा होत नसल्याचेच दिसून येत आहे. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतचेच उपचार मोफत होत असून अनेकदा हृदयशस्त्रक्रियेसाठी दिलेल्या खर्चाचे ‘पॅकेज’ त्याहून जास्तीचे असते. या अधिकच्या खर्चाची तजवीज करण्यासाठीही बालरुग्णांच्या पालकांना चांगलीच वणवण करावी लागत आहे. ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’त (आरबीएसके) हृदयविकाराचे निदान झालेल्या काही मुलांच्या पालकांनी याबाबतचा आपला अनुभव ‘लोकसत्ता’कडे मांडला.
हे सर्व पालक मजूर, कामगार, तसेच शेतकरी वर्गातील आहेत. एका सहा महिन्यांच्या मुलाचे वडील म्हणाले,‘‘सहा महिन्यांपूर्वी आम्हाला पुण्यातील जीवनदायी योजना स्वीकारलेल्या मोठय़ा रुग्णालयाने साडेतीन लाख रुपयांचे पॅकेज दिले. त्यातील दीड लाखांचाच खर्च योजनेतून होऊ शकणार असल्याचे सांगितले. दोन लाखांचा खर्च करण्याची आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही बंगळुरूच्या एका ट्रस्टच्या रुग्णालयातही मुलाला घेऊन गेलो. पण तिथेही शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. आता आम्ही पैसे जमवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.’’   
मजूर कुटुंबातील एका अकरा वर्षांच्या मुलीच्या पालकांनी सांगितले, ‘‘दोन वर्षांपूर्वी मुलीच्या हृदयाचा व्हॉल्व खराब असल्याचे निदान झाले होते. मधल्या काळात तिला इंजेक्शन व गोळ्या सुरू ठेवल्या होत्या. आता पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी जीवनदायी योजना उपलब्ध असलेल्या पिंपरीच्या रुग्णालयाने अडीच लाख रुपयांचा खर्च सांगितला. ऐपत नसल्यामुळे आम्ही डिसचार्ज घेऊन घरी आलो आहोत.’’
‘खासगी रुग्णालयांमध्ये हृदयशस्त्रक्रियांचे दर दीड लाखांच्या वर आहेत. परंतु जीवनदायी योजनेत जवळपास सर्व हृदयशस्त्रक्रियांसाठी रुग्णालयांना दीड लाखांच्या आतच दर देण्यात आले आहेत,’ असे जीवनदायी योजनेचे पुण्याचे समन्वयक वैभव गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ही योजना उपलब्ध असलेल्या रुग्णालयांनी या ठराविक दरातच उपचार करणे बंधनकारक आहे. ससून, सह्य़ाद्री, पवना रुग्णालयामध्ये यापूर्वी आरबीएसके डॉक्टरांनी पाठवलेल्या रुग्णांच्या हृदयशस्त्रक्रिया झाल्या आहेत.’’
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे म्हणाले, ‘‘शस्त्रक्रियेत धोका अधिक असेल तर अद्ययावत सुविधांच्या दृष्टीने ती मोठय़ा रुग्णालयातच करावी लागते. या रुग्णालयांमध्ये अधिक खर्च होत असून हा खर्च भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या पुण्यात आरबीएसके डॉक्टरांनी निदान केलेल्या दोन रुग्णांच्या हृदयावरील उपचारांसाठी साडेतीन ते चार लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या रुग्णांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत.’’