पुणे : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अभियंता असलेल्या एका महिलेला दुर्मीळ विकार झाला. तिच्या मणक्यात गाठ निर्माण झाल्याने तीव्र पाठदुखी सुरू झाली. दैनंदिन कामे करणेही तिच्यासाठी अवघड बनले. ती सहा महिन्यांपासून या विकाराने त्रस्त होती. अखेर डॉक्टरांनी लॅमिनेक्टोमी ॲन्ड डीकॉम्प्रेशन ऑफ कॉर्ड या प्रक्रियेद्वारे तिच्या मणक्यातील गाठ काढण्यात यश मिळवले. यामुळे ती आता दैनंदिन जीवन व्यवस्थितपणे जगू शकत आहे.

या महिलेला पाठीतील वेदना एखादे काम केल्यानंतर नव्हे तर रात्री झोपेत किंवा कोणत्याही वेळी सुरू व्हायची. त्यांनी काही ठिकाणी औषधे व फिजिओथेरपीद्वारे उपचार घेतले परंतु, वेदना कमी झाल्या नाहीत. अखेर त्यांची लक्षणे लक्षात घेऊन मणक्याची एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाठीच्या कण्याच्या मध्यभागी गाठ असल्याचे आढळून आले. याला टेराटोमा ऑफ कॉर्ड ॲट डी९ लेव्हल असे म्हणतात.

याबाबत नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरमधील डॉ.विशाल चौधरी म्हणाले की, या दुर्मीळ विकाराचे निदान वेळेवर न झाल्यास पायातील ताकद कमी होऊ शकते आणि मणक्याचे कायमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आम्ही लॅमिनेक्टोमी ॲन्ड डीकॉम्प्रेशन ऑफ कॉर्ड प्रक्रिया करायचे ठरवले असे लॅमिनेक्टोमी प्रक्रियेमध्ये पाठीच्या कण्यावर किंवा नसांवर येणारा दाब कमी करण्यासाठी कशेरूकाच्या हाडाचा एक भाग काढून टाकण्यात येतो. या प्रक्रियेदरम्यान कुठल्याही नसांवर कोणत्याही प्रकारचा दाब पडतोय का किंवा काही परिणाम होत आहे का यासाठी सातत्याने न्युरो मॉनिटरींग सिस्टिमचा वापर करण्यात येतो. सुमारे साडेचार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर गाठ काढण्यात यश आले.

महिलेच्या शरीरातील गाठ ही कर्करोगग्रस्त नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. मात्र एकाच ठिकाणी स्थित आणि वाढत असल्याचे निदान झाले.अशा प्रकारची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते आणि शस्त्रक्रियेनंतर पायातील ताकद जाणे किंवा मूत्राशयातील संवेदना कमी होणे अशी जोखीम असू शकते. या शस्त्रक्रियेनंतर आता ही महिला पूर्णपणे बरी असून घरची दैनंदिन कामे करीत आहे. ती आता कार्यालयीन काम करण्यासह सज्ज झाली आहे, असे चौधरी यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमका विकार काय?

पाठीच्या कण्यात निर्माण झालेल्या टेराटोमा ऑफ कॉर्ड ॲट डी९ लेव्हल हा जंतूपेशींपासून निर्माण होणारा एक दुर्मीळ विकार आहे. यात सामान्यत: पाठीच्या कण्यातील किंवा आजूबाजूच्या उतींमध्ये गाठ निर्माण होते. या विकाराचे निदान सहसा एमआरआय किंवा हिस्टोलॉजिकल म्हणजेच पेशींची मायक्रोस्कोपिक तपासणी याद्वारे केली जाते. उपचारांमध्ये बहुतांशवेळा गाठ काढून टाकण्यासाठी आणि पाठीचा कण्यावरील दाब काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते.