पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी आज बंगलोर येथे निधन झाले. उद्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यावेळी गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (२५ जुलै) रोजी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
देवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी शोकसंदेश पाठविला आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी होणाऱ्या अंत्यसंस्कारप्रसंगी सरसंघचालक आणि सरकार्यवाह उपस्थित राहणार आहेत. मदनदासजी यांच्या जाण्याने आमचा ज्येष्ठ सहकारी गमावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शारीरिक अस्वास्थ्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता. आज पहाटे त्यांच्या या संघर्षाचा आपल्या सर्वांसाठी दुःखद अंत झाला आहे. .मदनदासजी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते.
हेही वाचा >>> अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर; पात्रता गुणांमध्ये घट
अनेक वर्षे त्यांनी परिषदेचे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. स्वर्गीय यशवंतराव केळकरजी यांच्या सहवासात त्यांनी संघटनकलेच्या गुणवत्तेला परिपूर्ण रूप दिले, असे भागवत यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. मदनदास देवी यांचं पार्थिव उद्या सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी पुण्यातील मोती बाग येथील संघाच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मदनदास देवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजपचे नेते गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, धर्मेंद्र प्रधान यांच्या सह अनेक नेते मंडळी येणार आहेत.
पुण्यात उद्या अंत्यसंस्कार
मदनदास देवी यांचे पार्थिव मंगळवारी (२५ जुलै) सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत पार्थिव मोतीबागेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर साडेअकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यावेळी उपस्थित राहतील.
मदनदास देवीजी यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्याशी माझे केवळ घनिष्ठ संबंधच नव्हते, तर त्यांच्याकडून मला खूप काही शिकायलाही मिळाले.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान