पुणे : सर्व काही सरकार करेल ही पाश्चात्य आणि चुकीची धारणा आहे. सुरक्षा, न्याय अशा काही व्यवस्थांसह छोटी-मोठी कामे सरकार निश्चितपणे करेल. परंतु, समाजासाठी आवश्यक प्रत्येक काम करणे हे समाजाचेच दायित्व आहे, हा विश्वास समाजात पुनर्स्थापित करूया, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी शनिवारी व्यक्त केले. त्यासाठी ‘जनकल्याण समिती’सारख्या संस्थांचे कार्य अधिक गतीने पुढे त्ण्यातूनच समाज प्रगती करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ या संस्थेला आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. कृष्णगोपालजी बोलत होते. संकेश्वर पीठाचे शंकराचार्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर आणि जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे व्यासपीठावर होते.

कृष्णगोपालजी म्हणाले, ‘संघाचे कार्यकर्ता निर्माणाचे कार्य प्रारंभीची अनेक वर्षे समाजाच्या लक्षातच आले नाही. संघ युवकांची शक्ती वाया घालवत आहे, अशी टीकाही त्या काळात झाली. परंतु, समाजाविषयीची तळमळ आणि समाजाचे दुःख हे आपले दुःख मानून संघ स्वयंसेवकांनी हजारो सेवाकार्ये सुरू केली. त्याचा लाखो जणांना लाभ झाला. समाजात जाऊन सेवाकार्य करण्याची संघाची कार्यशैली अद्भुत ठरली. भक्तीभावाचे नाव आध्यात्म आहे आणि संवेदना, करुणा, हे आध्यात्माचे मूळ आहे. नुकताच प्रयागराज येथे झालेला महाकुंभ हेही आध्यात्मभावाचेच प्रगटीकरण आहे. करुणा, प्रेम, समर्पणाचे दर्शन घडलेला कुंभमेळा ऐक्य भावाचे प्रतीक ठरला.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’तर्फे सेंद्रिय शेती आणि त्या विषयातील संशोधनाचे महत्त्वपूर्ण आणि सफल कार्य सुरू आहे. त्याचे प्रारूप देशात ठिकठिकाणी राबविण्याचे प्रयत्न झाले तर शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष ताराचंद गोयल यांनी व्यक्त केला. ‘मी जी कामगिरी करू शकलो त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करणारे खेळाडू घडवून हॉकीमध्ये कांस्यपदकाकडून सुवर्णपदकाकडे आपल्या देशाची कामगिरी करण्याचे ध्येय आहे’, असे श्रीजेश यांनी सांगितले. जगात भारताला विश्वगुरू हा सन्मान निश्चितपणे प्राप्त होईल, असा विश्वास शंकराचार्य यांनी व्यक्त केला. मराठे यांनी प्रास्ताविकामध्ये समितीच्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली. सेवा भारती संस्थेचे सचिव प्रदीप सबनीस यांनी मानले. डॉ. प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.