पुणे : समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या मालिकेने रस्ता सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी प्रवासी बसला आग लागून अपघात घडण्याच्या घटना वाढत आहेत. या बसमध्ये करण्यात आलेले काही तांत्रिक बदल यासाठी कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. याचबरोबर बसच्या समोरील बाजूस जास्त क्षमतेचे दिवे लावल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात सुरू आहेत. या अपघातांच्या मालिकेमुळे परिवहन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देताना महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे. अनेक खासगी बसमध्ये प्रकाशयंत्रणेत बदल केले जातात. याकडे आरटीओकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. अशा बदलांमुळे बसला आग लागण्याच्या घटना घडूनही परिवहन विभागाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची बाब उघड झाली आहे.

हेही वाचा – डॉ. प्रदीप कुरुलकर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी एटीएस कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्षाचे आंदोलन

समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे खासगी बसला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, वाहनांना जास्तीत जास्त सात वॉटचे दिवे लावता येतात. खासगी बसला जास्त क्षमतेचे २० ते २५ वॉटचे हॅलोजन दिवे लावले जातात. जास्त क्षमतेचे दिवे लावण्यासाठी आणखी वायरिंग केले जाते. ते निकृष्ट असल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात, अशी माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.

याबाबत पुण्यातील ‘थ्री ए रोड’ फाउंडेशनचे संचालक विजयकुमार दुग्गल यांनी २८ मार्चला परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांना पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी खासगी प्रवासी बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ आणि त्याची कारणे मांडली होती. त्यामुळे खासगी बसमध्ये करण्यात येत असलेल्या अतिरिक्त प्रकाश योजनेचा मुद्दाही उपस्थित केला होता.

हेही वाचा – स्वस्तात ऑनलाइन उत्पादने खरेदीचा मोह अंगलट; व्यावसायिकाची १ कोटी २१ लाखांची फसवणूक

शॉर्टसर्किट झाल्यामुळे खासगी बसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. अनेक बसला समोरच्या बाजूला अतिरिक्त सहा ते सात दिवे लावले जातात. हे हॅलोजन दिवे असतात. जास्त क्षमतेच्या दिव्यांसाठी अतिरिक्त वायर जोडणी केली जाते. कमी दर्जाचा वायर असल्यास शॉर्ट सर्किट होऊन आगीच्या घटना घडतात. रात्रीचा वेळी प्रवासी झोपलेले असल्याने अशी दुर्घटना घडल्यास त्याची तीव्रता वाढते. – विजयकुमार दुग्गल, संचालक, थ्री.ए. रोड सेफ्टी फाउंडेशन