पुणे: जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येला वेगळं वळण मिळालं आहे. आवारे यांनी डिसेंबर महिन्यात भालचंद्र (भानू) खळदे यांना नगर परिषदेतील सीईओच्या दालनात सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. हाच बदला घेण्यासाठी भालचंद्र खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने किशोर आवारे यांची हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

शुक्रवारी जनविकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली होती. याप्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

आणखी वाचा-भरदिवसा हत्येचा ‘मावळ पॅटर्न’!

सहाय्यक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट म्हणाले, डिसेंबरमध्ये तळेगाव नगरपरिषदेत भानुप्रताप खळदे आणि किशोर आवारे यांच्यात वाद झाला होता. किशोर आवारे यांनी सर्वांसमोर खळदे यांच्या कानशिलात लगावली. खळदे यांनी याबाबत अदखलपात्र तक्रार तळेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पुढे ते म्हणाले, भानुप्रताप खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला नेहमी वाटायचं की आपल्या वडिलांचा अपमान झाला, वडिलांची प्रतिष्ठा गेली. सर्वांसमोर त्यांनी मारले हा राग मुलगा गौरवच्या मनात होता. त्याने एक टीम तयार करून हत्या घडवून आल्याचं समोर येत आहे. आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गौरव खळदे हा सिव्हिल इंजिनिअर आहे. तो त्यांचा बांधकाम व्यवसाय संभाळतो. गौरव खळदेची आणि हत्या करणारा श्याम निगडकर यांची मैत्री आहे. गौरव खळदे हा श्यामला वेळोवेळी आर्थिक मदत करत होता. याच मैत्रीसाठी श्याम निगडकर आणि त्याच्या साथीदाराकडून किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. यासाठी जानेवारी पासून किशोर आवारे याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. गेल्या महिन्याभरापासून रेकी करत होते. अखेर नगरपरिषदेच्या कार्यालयात त्यांना गाठून हत्या केली.