‘फू बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले भाऊ कदम यांनी आपल्या खुसखुशीत भाषणाने व विनोदी किश्शांनी देहूकरांनी मनेजिंकली. विनोदी भूमिका करायला आवडतात, प्रेक्षकांनाही तेच भावते. त्यामुळे गंभीर भूमिका करणार नाही. शाळेत पाढे पाठ होत नव्हते, अभ्यास करत नव्हतो म्हणून खूप फटके मिळाले, अशा अनेक गमतीदार आठवणी त्यांनी सांगितल्या.
रामकृष्ण मोरे फाउंडेशनच्या वतीने आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते त्यांना ‘रामकृष्ण मोरे कलागौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी बोलताना भाऊ म्हणाले, विनोदामुळे दु:ख हलके होते. मी गंभीर भूमिका केल्यास प्रेक्षकांनाही आवडणार नाही. घरात असताना मी विनोदी नसतो, मित्रांमध्ये असतो. लहानपणी अभंग, व्याख्याने ऐकायचो, त्याचा पुढे उपयोग झाला. महिलांचे पात्र सादर करताना बरीच कसरत करावी लागते. शांताबाईचे पात्र बरेच गाजले. मात्र, आता ते नकोसे वाटते. आजी वारली, तेव्हा दु:खात असतानाही विनोदी प्रसंग सादर करावे लागले. मी कुणीतरी व्हावे ही वडिलांची इच्छा होती. आजची प्रगती पाहण्यासाठी ते नाहीत, हे सांगताना भाऊ भावूक झाले. मेहमूद, निळूभाऊ, दामूअण्णा, दादा कोंडके, अशोकमामा, भरत, मकरंद, रंजना, स्मिता पाटील हे आवडते कलावंत असल्याचे त्याने सांगितले.
प्रास्तविक सुनील कंद यांनी केले. उमेश ठिजगे यांनी सूत्रसंचालन केले.
‘चला, हवा येऊ द्या’वर चित्रपट?
‘झी’ मराठीवर लोकप्रिय ठरलेल्या ‘चला, हवा येऊ द्या’ या मालिकेवर आधारित चित्रपट निर्मिती करण्याच्या दृष्टीने जुळजुळव सुरू आहे. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’पेक्षा हा कार्यक्रम उजवा ठरल्याची भावना दोन्ही कार्यक्रमात सहभागी झालेले अभिनेते सांगतात. टीमवर्क आणि दिग्दर्शक नीलेश साबळेची कल्पकता हे कार्यक्रमाच्या यशाचे रहस्य आहे, अशी टिपणी भाऊ कदमांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2015 रोजी प्रकाशित
पाठांतर आणि अभ्यासावरून खूप फटके मिळाले – भाऊ कदम
‘फू बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले भाऊ कदम यांनी आपल्या खुसखुशीत...

First published on: 08-11-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recitation shots study bhau kadam