कृष्णविवर, न्यूट्रॉन तारा, ताऱ्याचा महाविस्फोट, गॅमा किरणांचा विस्फोट.. सामान्य नागरिकांचेही लक्ष चटकन वेधून घेणाऱ्या या खगोलशास्त्रीय गोष्टींचा अभ्यास आता ‘अॅस्ट्रोसॅट’चा वापर करुन आणखी चांगल्या प्रकारे करता येणार आहे. अॅस्ट्रोसॅटच्या प्रवासात स्वत: सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत अॅस्ट्रोसॅटचे विविध पैलू उलगडले.
‘आयुका’चे (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) माजी संचालक आणि ‘अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष अजित केंभावी, शास्त्रज्ञ प्रो. दिपंकर भट्टाचार्य, डॉ. रंजीव मिश्रा, डॉ. गुलाब देवांगण, डॉ. वरुण भालेराव आणि ‘एनसीआरए- टीआयएफआर’चे (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स) केंद्र संचालक स्वर्ण कांती घोष या वेळी उपस्थित होते.
‘अॅस्ट्रोसॅट’ या संशोधन वेधशाळेच्या रुपातील उपग्रहाचे भारताने सोमवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन प्रक्षेपण केले. या वेधशाळेत पाच दुर्बिणी असून त्यातील चार दुर्बिणींमधून जवळची व लांबची अतिनील किरणे आणि कमी व जास्त तीव्रतेची ‘क्ष’ किरणे पाहता येणार आहेत. अवकाशात काही अनपेक्षित घटना घडते आहे का हे पाहण्याचे काम पाचवी दुर्बिण (स्कॅनिंग स्काय मॉनिटर) करणार आहे, अशी माहिती घोष यांनी दिली.
डॉ. भालेराव म्हणाले,‘प्रकाशाच्या स्रोतात घडणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेत विविध प्रकारचे किरणोत्सर्जन होते आणि प्रत्येक प्रकारचा प्रकाश त्या स्रोताविषयी वेगळी माहिती देतो. स्रोतात होणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया अॅस्ट्रोसॅटद्वारे एकत्रितपणे समजून घेता येतील. प्रकाशाच्या अनेक स्रोतांमध्ये सातत्याने बदल होत असतो. अशा प्रकारचा प्रकाशस्रोताचे एकाच वेळी विविध तरंगलांबीच्या किरणांसाठी निरीक्षण करणे आवश्यक ठरते.’
अवकाशातील मृत्युपंथाला लागलेल्या ताऱ्यांबरोबरच नुकतेच जन्माला आलेल्या ताऱ्यांचे निरीक्षणही अॅस्ट्रोसॅटद्वारे करता येईल, असे प्रो. भट्टाचार्य यांनी सांगितले. ते म्हणाले,‘न्यूट्रॉन ताऱ्यासारख्या प्रकाशस्रोताचे जडत्व, कक्षा, त्याचे गुरूत्वाकर्षण या गोष्टींचा अभ्यास करता येईल. कृष्णविवरामध्ये जेव्हा इतर तारे ओढले जातात तेव्हा त्याचे तापमान वाढत जाते. हे इतर गोष्टींचे आत ओढले जाणे खूप चांगल्या प्रकारे अभ्यासता येऊ शकेल.’
डॉ. मिश्रा म्हणाले,‘अॅस्ट्रोसॅट खगोलशास्त्रीय प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वापरता येईलच; पण त्याद्वारे मिळालेल्या माहितीतून खगोलशास्त्रातील नवे प्रश्न समोर येतील आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठी आणखी नव्या पिढीतील उपग्रह बनवावा लागेल.’
साधारणत: ६ महिन्यांनंतर अॅस्ट्रोसॅटद्वारे काही शास्त्रीय परिणाम मिळू लागतील, असे डॉ. देवांगण म्हणाले. एका वर्षांनंतर या वेधशाळेद्वारे नियमित संशोधन सुरू होणार असून कुणीही त्यासाठी संशोधन प्रस्ताव सादर करु शकेल. बंगळुरूच्या ‘इंडियन स्पेस सायन्स डेटा सेंटर’मध्ये अॅस्ट्रोसॅटद्वारे मिळवलेली माहिती साठवली जाईल. विविध संशोधन केंद्रांमधील शास्त्रज्ञ या माहितीचा वापर आपल्या संशोधनासाठी करतील, असेही त्यांनी सांगितले.
या लक्षवेधी गोष्टी अभ्यासता येणार-
– कृष्णविवर- कृष्णविवरात खगोलशास्त्रीय वस्तू खेचल्या जाताना प्रचंड तापमान निर्माण होते. कृष्णविवर प्रत्यक्ष पाहता येत नसले तरी त्याभोवताली होणारा ‘क्ष’ किरणांचा उत्सर्ग अॅस्ट्रोसॅटमधून टिपता येईल.
– ‘न्यूट्रॉन’ ताऱ्याचे जडत्व सर्वाधिक मानले जाते. अशा ताऱ्याच्या ठिकाणी असलेल्या गुरूत्वाकर्षणाचा अभ्यास करता येईल.
– आकाशगंगांची केंद्रके अभ्यासता येतील.
– ताऱ्याचा महाविस्फोट तसेच गॅमा किरणांच्या विस्फोटांचाही अभ्यास करता येईल.