लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: खडकवासला ते इंदापूरपर्यंत वाहत असलेला नवीन मुठा उजव्या कालव्याची गळती रोखणे, मजबुतीकरण, कालव्यातील राडारोडा काढणे या कामांसाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या उपाययोजना केल्यामुळे कालव्याची वहन क्षमता वाढल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे.

खडकवासला ते इंदापूरपर्यंत २०२ किलोमीटर लांबीचा मुठा उजवा नवीन कालवा आहे. या कालव्याचे काम १९६० रोजी पूर्ण झाले. त्याला ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत २९ किलोमीटर लांब हा कालवा आहे. शहरातील धायरी, नांदेड, जनता वसाहत, लष्कर छावणी भाग, हडपसर या भागांसह पुढे फुरसुंगी, लोणीकाळभोर या भागातून पुढे दौंड आणि शेवटी इंदापूरला हा कालवा पोहोचतो. २०१८ मध्ये मुठा उजवा कालवा दांडेकर पूल परिसरात फुटला होता. या पार्श्वभूमीवर दरवर्षी कालव्याची पाहणी करून देखभाल-दुरुस्ती केली जाते. या कालव्याच्या शहरी भागात अजूनही ४० टक्के पाणी गळती होत होती. ही गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण आणि मजबुतीकरणाची कामे सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ३७ कोटींचा निधी मंजूर आहे. त्यापैकी ३५ कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. हा कालवा कायमच वाहता असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात अडचणी येत होत्या.

आणखी वाचा- पुणे : सिंहगड रस्त्यावर फर्निचर दुकानात आग

या कालव्याची एक हजार क्युसेक वहन क्षमता आहे. कालव्यालगत प्रचंड अतिक्रमणे झाल्यामुळे गेल्या काही वर्षापासून या कालव्यात कचरा, राडारोडा सातत्याने टाकण्यात येतो. तसेच कालव्याचे भराव सैल झाले आहेत. त्याचप्रमाणे कालव्याखालून पाण्याची सुमारे ४० टक्के गळती होत असल्यामुळे शेवटपर्यंत म्हणजेच इंदापूरपर्यंत कमी पाणी पोहोचते.

गेल्या काही वर्षांपासून या कालव्याची दुरुस्ती, अस्तरीकरण तसेच मजबुतीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे कालव्यास भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये उंदीर, घुशी यांनी राहण्यासाठी जागा केली असल्याने कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर या छिद्रामध्ये पाणी जात आहे. त्यामुळे गळती होणे प्रसंगी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून कालवा फुटणे अशा घटना वारंवार होत आहेत. त्यातच या कालव्यातून कायमच शेतीसाठी पाणी सोडण्यात येत असल्याने या कालव्यात ओलावा असतो. त्यामुळे भरावाचे काम केले तरी खालच्या भागात ओलावा असल्याने दुरुस्तीनंतर हा भाग चांगला सुकत नाही, तोपर्यंत संबंधित भागातील गळती थांबत नसल्याचे जलसंपदा विभागाचे निरीक्षण आहे.

आणखी वाचा- अतिरिक्त ठरलेले आठ शिक्षक ११ वर्षांपासून वेतनाविना, शिक्षण विभागाचा लालफितीचा कारभार

‘कालव्याच्या भरावाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. फुरसुंगी (देशमुख मळा) तसेच खडकवासला, धायरी, जनता वसाहत ते शिंदेवस्तीपर्यंत कालव्याच्या दुरुस्तीची कामे केली आहेत. या कामासाठी सुमारे ३७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ३५ कोटींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत,’ अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reinforcement of new mutha right canal works of 2 crore pune print news psg 17 mrj
First published on: 08-03-2023 at 10:29 IST