नवाकोरा पडदा, आधुनिक ध्वनी व चित्रव्यवस्था आणि चकचकीत खुच्र्या असे देखणे रूप घेऊन पूर्वी ‘प्रभात’ या नावाने सर्वश्रुत असलेले ‘किबे लक्ष्मी थिएटर’ रसिकांसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे ‘मराठी चित्रपट दाखवणारे चित्रपटगृह’ अशी असलेली आपली ओळखही हे चित्रपटगृह कायम ठेवणार आहे.
चित्रपटगृहाचे मालक अजय आणि सुरेश किबे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी ही माहिती दिली. चित्रपटगृहाचे नूतनीकरण आता पूर्ण झाले असून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ते रसिकांसाठी खुले होईल. चित्रपटाचे मालक किबे बंधू पुण्यात राहत नाहीत. अजय किबे हे इंदूरला इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, तर सुरेश किबे बंगळुरूला ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’त (इस्रो) ‘सॅटेलाइट नॅव्हिगेशन’ विभागाचे प्रकल्प संचालक होते.
नवीन पडदा व नव्या खुच्र्यासह चित्रपटगृहात ‘डॉल्बी ६५०’ ही ध्वनिव्यवस्था व चित्रपट दाखवण्यासाठी ‘बार्को ४ के’ हा प्रोजेक्टर बसवण्यात आला आहे. वातानुकूलन यंत्रणा मात्र अद्याप चित्रपटगृहात उपलब्ध नसून पूर्वीच्या रचनेनुसार पंखेच बसवण्यात आले आहेत. ‘मराठी चित्रपटगृह’ अशी रूढ झालेली चित्रपटगृहाची ओळख पुसली जाणार नाही, असेही किबे बंधूंनी स्पष्ट केले, तसेच चित्रपटगृह अजून सुरू झाले नसल्यामुळे तिकिट दर ठरलेले नसले तरी ते शंभर रुपयांच्या आतच राहतील, असेही ते म्हणाले.
सुरेश किबे म्हणाले, ‘मी चित्रपटगृह चालवेन असे मला कधीही वाटले नव्हते. आम्ही या व्यवसायात नवीन असलो तरी चित्रपटगृहांविषयीचे तांत्रिक ज्ञान आमच्याकडे आहे. नूतनीकरण करताना चित्रपटगृहाचा मूळ ढाचा कायम ठेवण्यात आला असून एकही खुर्ची कमी किंवा जास्त नाही. ध्वनी आणि चित्रव्यवस्था सुधारण्यात आली आहे. पूर्वी या चित्रपटगृहातील स्वच्छतागृहे तितकीशी चांगली नव्हती, ती व्यवस्थाही नव्याने केली आहे. ध्वनियंत्रणेतील तज्ज्ञ म्हणून नावाजल्या गेलेल्या श्री. वैद्य व श्री. सय्यद यांना बोलवून आम्ही ध्वनिव्यवस्था तपासून घेतली.’
याआधी लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाचे व्यवस्थापन पाहिलेले भालचंद्र पाटील हे आता किबे लक्ष्मी थिएटरचे व्यवस्थापक म्हणून काम करणार आहेत.
चित्रपटगृहाचा इतिहास असा –
१८६० मध्ये आताच्या या चित्रपटगृहाच्या जागेवर सरदार गणेश विठ्ठल ऊर्फ दाजीसाहेब किबे यांचा वाडा होता. पुढे पुण्यात असलेली नाटय़गृह वा चित्रपटगृहाची गरज ओळखून २१ सप्टेंबर १९३४ मध्ये चित्रपटगृहाची इमारत बांधली गेली. सरदार रामचंद्र मुकुंदराव किबे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या नावावरून या चित्रपटगृहाचे नामकरण करण्यात आले. त्याच सुमारास कोल्हापूरच्या प्रभात फिल्म कंपनीने आपले कार्यस्थळ पुण्यास हलवले आणि हे चित्रपटगृह या कंपनीला चित्रपट प्रदर्शनासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले. प्रभात कंपनीच्या नावावरून चित्रपटगृहालाही ‘प्रभात’ असे नाव मिळाले. जानेवारी २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभात थिएटर प्रा. लि. ने चित्रपटगृह किबे बंधूंच्या हाती सुपूर्द केले.