पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगत् गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पुणे शहरातून १२ आणि १३ जूनला होणार असल्याने या दिवशी होणाऱ्या परीक्षांचे फेरनियोजन करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला. या दोन्ही दिवसांच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ ते १६ जूनदरम्यान पालखीचे प्रस्थान सासवड परिसरातून होणार असल्याने या कारणास्तव परीक्षा देता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. विद्यापीठाने मार्च २०२३च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा ६ जूनपासून सुरू करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र   विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी केलेल्या विनंतीनुसार पालखीचे प्रस्थान पुणे शहरातून १२ आणि १३ जूनला होणार असल्याने या दिवशीच्या परीक्षांचे फेरनियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्या नुसार विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयातील १२ आणि १३ जूनला होणाऱ्या परीक्षांचे फेरनियोजन करण्यात येईल.

हेही वाचा >>> ‘त्या’ मुलांची कुटुंबीयांशी पुन्हा झाली भेट!, रेल्वे सुरक्षा दलाकडून १६३ जणांची सुटका

सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. तर १४ ते १६ जूनदरम्यान पालखीचे प्रस्थान सासवड परिसरातून होणार असल्याने या कारणास्तव परीक्षा देता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे विशेष परीक्षेसाठीचे अर्ज महाविद्यालयामार्फत परीक्षा विभागाला सादर करावेत. विशेष परीक्षेसाठीच्या अर्जासाठी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज सादर करावेत. कोणत्याही कारणांमुळे विशेष परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rescheduling of exams by university palkhi ceremony new schedule pune print news ccp 14 ysh
First published on: 09-06-2023 at 10:49 IST