फुगडी, सागरगोटे, झिम्मा या छोटय़ा खेळांपासून ते मैदानी खेळांपर्यंतचा आणि महिलांच्या पारंपरिक खेळांपासून ते मर्दानी खेळांपर्यंतचा समग्र इतिहास शब्दबद्ध करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महिलांच्या पारंपरिक देशी खेळांचे संशोधन आणि त्याचे संकलन अशा स्वरूपाच्या या प्रकल्पात विविध क्षेत्रांतील महिलांनी लक्षणीय योगदान दिले आहे.

जुन्या काळातील महिला मुख्यत: गृहिणी होत्या. त्यामुळे दिवसभर त्यांचे वास्तव्य घरातच असे. रोजच्या कामांच्या व्यापातून त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, थोडा व्यायाम व्हावा, त्यांना काही बौद्धिक खाद्य मिळावे यासाठी अनेकविध खेळ खेळले जात असत. हे खेळ प्रामुख्याने घराच्या ओसरीवर, वाडय़ाच्या अंगणात किंवा छोटय़ा मैदानांवर खेळले जात. विसाव्या शतकात महिला सर्व क्षेत्रात धडाडीने पुढे आल्या. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कर्तृत्व गाजवले. या काळात महिला घराबाहेर पडल्या. त्यामुळे महिलांचे देशी पारंपरिक खेळ हळूहळू मागे पडले. अनेक खेळ नव्या पिढीला माहिती नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. असे सर्व खेळ सर्वानाच पुन्हा माहिती व्हावेत या उद्देशाने आणि मुख्यत: या खेळांच्या इतिहासाचे व माहितीचे जनत व्हावे या हेतूने ‘भारतीय इतिहास संकलन समिती’तर्फे हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेला असून माहितीचा संदर्भग्रंथही प्रसिद्ध झाला आहे.

2024 25 is the last year for textbooks of I and II
राज्यात पहिली, दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष… आता होणार काय?
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…

प. महाराष्ट्रातील महिलांचे देशी खेळ, खेळसंस्कृती व स्त्रिया, बाहुलीचे खेळ, भातुकलीचा खेळ, नृत्यप्रधान खेळ, लोकसंस्कृती व स्त्रियांची नृत्यगीते, फुगडी गीते, हादगा-भोंडला, लोकगीते, मैदानी- मर्दानी खेळ या आणि अशा अनेकविध अंगांनी खेळांच्या माहितीचे संकलन या ग्रंथात करण्यात आले आहे. या विषयाच्या अनुषंगाने शंभराहून अधिक खेळांची माहितीही संकलित झाली आहे.

‘पश्चिम महाराष्ट्रातील महिलांचे पारंपरिक देशी खेळ : प्राचीनत्व व महत्त्व’ या ग्रंथाचे संपादन डॉ. शुभांगना अत्रे यांनी केले असून त्यांना या कामात प्रतिभा धडफळे आणि शिल्पा वाडेकर यांनी साहाय्य केले आहे. महिलांच्या खेळांचे सांस्कृतिक पैलू, जनजातीय स्त्रियांचे खेळ, मैदानी खेळ असे या ग्रंथाचे तीन मुख्य भाग आहेत. महाराष्ट्रातील विविध क्रीडा संस्थांची माहितीही सविस्तररीतीने या ग्रंथात देण्यात आली आहे. महिलांचे पारंपरिक खेळ हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय सर्वासमोर यावा, या हेतूने तयार करण्यात आलेल्या या ग्रंथात महिलांच्या पारंपरिक खेळांचा विचार समग्रतेने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या संशोधनाबाबत तसेच संदर्भग्रंथाबाबत प्रतिभा धडफळे (९४२२५६३११२) यांच्याशी संपर्क साधता य़ेईल.

महिलांचे अनेकविध पारंपरिक खेळ नव्या पिढीला माहिती करून देण्यासाठी, त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था तसेच क्रीडाक्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेतल्यास या खेळांचे जनत होणे शक्य आहे, अशीही आशा या ग्रंथातून व्यक्त करण्यात आली आहे.