पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा झाला आहे. आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले असता यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला आहे.

आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे पोलिसांसह पालिका अधिकारी पोहोचले होते. मात्र यावेळी स्थानिकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केला. तसंच ‘पुणे पोलीस मुर्दाबाद’ अशा घोषणादेखील देण्यात आल्या. काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे.

पोलीस अचानक आले आणि आम्हाला घर खाली करण्यास सांगत आहेत. आम्हाला या कारवाईसंबंधी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती असं गाऱ्हाणं मांडत आमचं घर गेल्यावर कुठे जायचं असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आम्ही येथे ५० ते ६० वर्षांपासून राहत असून आम्हाला पर्यायी व्यवस्था द्यावी त्यानंतर कारवाई करा अशी नागरिकांची मागणी आहे. तसंच पालिका नाही तर खासगी बिल्डरच्या नोटीशीनंतर कारवाई सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नोटीशीवर पुणे मनपाचा शिक्का का नाही? अशी विचारणा स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

आणखी वाचा- आंबिल ओढा कारवाई : “पाऊस सुरूये, करोना आहे; आम्ही मरायचं का?”

निलम गोऱ्हेंचा आरोप

“गेले १५ दिवस मी महापालिका आयुक्त, एसआरए अधिकारी यांची भेट घेत आहे. १५ जुलैपर्यंत एसआरएच्या संदर्भातील तक्रारीसंबंधी वेळ देण्याची मागणी करत आहे. ओढ्यामागील परिसरातील कोणतंही स्थलांतर करण्यात आलेलं नाही. फक्त एसआरएसाठी जी जागा रिकामी करायची आहे तिथे अतिक्रमण आणि सुरक्षेच्या नावाखाली तुघलकी पद्धतीने कारवाई केली जात आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर महापालिका आयुक्तांना निरोप दिला असतानाही कारवाई केल्याने आश्चर्य वाटत आहे. एकनाथ शिंदे यांनी २ वाजता यासंबंधी बैठक बोलावली आहे. पण त्याआधीच पालिकेचा हा सगळा कारभार सुरु आहे,” असा आरोप शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपा आमदार माधुरी मिसाळ, बिडकर आणि मुरलीधर मोहोळ यांनी विकासकासोबत बैठक घेऊन सुरक्षिततेच्या नावाखाली लोकांच्या घरावर नांगर फिरवत आहेत,” असाही आरोप निलम गोऱ्हे यांनी केला आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई चुकीची असल्याचं स्थानिक नगरसेवकांनी म्हटलं आहे.