पुणे : निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा धर्मादाय रुग्णालयासाठी ११.११ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.भारतीय प्रशासकीय सेवेतील ३४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर झगडे निवृत्त झाले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गासाठी समर्पित आयोगाच्या सदस्यत्वाची नियुक्ती त्यांनी स्वीकारली. त्यासाठी कोणतेही मानधन न घेण्याचा मनोदय त्यांनी राज्य शासनाकडे मांडला होता.

मात्र, मिळणाऱ्या मानधनातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी मदतीचा विचार त्यांनी केला. त्यानुसार मानधनाची रक्कम कस्तुरबा रुग्णालयासाठी दिली.सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय १९४५ मध्ये महात्मा गांधी यांच्या शिष्या डॉ. सुशीला नय्यर यांनी सुरू केले. हे रुग्णालय एक हजार खाटांचे असून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दरवर्षी हजारो रुग्णांवर उपचार केले जातात. महेश झगडे म्हणाले, ३४ वर्षांच्या सेवेतून निवृत्त होताना त्यानंतर कोणतीही सरकारी जबाबदारी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा : पुणे रेल्वे स्थानकावरील फलाटाच्या तिकीट दरात वाढ; गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून नागरिकांच्या मागासवर्गासाठी समर्पित आयोगाच्या सदस्यत्वाची तीन महिन्यांची नियुक्ती स्वीकारली. या नियुक्तीसाठी मानधन न घेण्याचा विचार होता, मात्र तो बदलून मिळणारे मानधन ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारांसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कस्तुरबा रुग्णालयासाठी धनादेश दिला आहे. भविष्यात ग्रामीण भागातील गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वांनीच शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहनही झगडे यांनी केले.