८४ लाख टन बिगरबासमती तांदळाची निर्यात

यंदा देशामध्ये तांदळाचे भरघोस उत्पादन झाले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांतील तांदूळ उत्पादनाची आकडेवारी विचारात घेता गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ९४५ लाख टन एवढे तांदळाचे उत्पादन झाले. एकीकडे उत्पादनात भरघोस वाढ होऊनही नवीन तांदळाचे भाव दहा ते पंधरा टक्क्य़ांनी वाढले आहेत. बांग्लादेश, आफ्रिकेत यंदा तांदळाचे उत्पादन कमी झाल्याने तेथून बिगर बासमती तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे. देशातून ८४ लाख टन बिगरबासमती तांदळाची निर्यात करण्यात आली आहे.

सरकारकडून करण्यात आलेली हमीभावातील वाढ, मिल व्यावसायिकांनी बिगर बासमती तांदळाच्या विक्रीत दाखविलेली सक्रियता आदी कारणांमुळे तांदळाचे उत्पादन वाढूनही भाव दहा ते पंधरा टक्क्यांनी वधारले आहेत, अशी माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष आणि जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी दिली. सध्या नवीन तांदळाचा हंगाम सुरु झाला आहे. मालाचा दर्जा चांगला आहे. मसुरी, सोनामसुरी, कोलम, लचकारी, चिन्नोर, कालीमुछ, आंबेमोहोर, ११२१ कोलम, एचएमटी कोलम, पारंपरिक बासमतीसह अन्य प्रकारच्या तांदळाची आवक होत आहे. २०१६ मध्ये देशातून ६० लाख टन तांदळाची निर्यात झाली होती. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ८४ लाख टन एवढा तांदूळ निर्यातीसाठी पाठविण्यात आला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत नवीन तांदूळ बाजारात विक्रीसाठी दाखल होतो. डिसेंबर २०१७ पासून इराणमधून बासमती तांदळाच्या मागणीत वाढ झाली असून जवळपास ४० लाख टन बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली आहे, असे शहा यांनी सांगितले.

यंदाच्या हंगामात देशात तांदळाचे भरघोस उत्पादन झाले आहे. सरकारने तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. यंदा बिगर बासमती तांदळाची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बासमती निर्यात करणाऱ्या मिल व्यावसायिकांनी बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा बिगरबासमती तांदळाची मोठी निर्यात होईल. हमीभाव तसेच मिल व्यावसायिकांकडून तांदूळ निर्यातीत दाखविण्यात आलेली सक्रियता पाहता त्यामुळे यंदा बिगरबासमती तांदळाच्या दरात वाढ झाली आहे, असे निरीक्षण शहा यांनी नोंदविले.

शंभर ते दीडशे लाख टन तांदूळ शिल्लक

भारत, थायलंड आणि चीन हे प्रमुख तांदूळ उत्पादक देश आहेत. भारतात ९५० लाख टन एवढे तांदळाचे उत्पादन होते. त्यापैकी १५० लाख टन तांदळाची निर्यात होते. ३०० ते ३५० लाख टन तांदळाची विक्री देशांतर्गत बाजारात होते. सरकारकडून विविध योजनांसाठी जवळपास २५० ते ३०० लाख टन तांदूळ खरेदी केला जातो. भरघोस उत्पादनामुळे निर्यातीत वाढ होऊनही भारतात १०० ते १५० लाख टन तांदूळ शिल्लक राहतो. तांदळाची साठवण करण्यासाठी सरकारकडून वखारी बांधण्यात आल्यास त्याचा निश्चित फायदा होईल आणि तांदूळ वाया जाणार नाही, असे घाऊक बाजारातील तांदळाचे प्रमुख विक्रेते राजेश शहा यांनी नमूद केले.