रिक्षा पंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पुण्यात रिक्षाची वयोमर्यादा वाढविण्याबाबत सकारात्मतक भूमिका घेतल्याने जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये याबाबतचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यात रिक्षाची वयोमर्यादा वीस वर्षांची असून, ही वयोमर्यादा वाढल्यास अनेक रिक्षा मालक व चालकांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे.
रिक्षा पंचायतीच्या विविध मागण्यांबाबत पंचायतीच्या शिष्टमंडळाशी जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, निमंत्रक नितीन पवार तसेच सिद्धार्थ चव्हाण, मधुकर भुजबळ, शैलेश गाडे, गणेश वैराट आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. रिक्षांना दरवर्षी तंदुरुस्ती प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्या वेळी रिक्षाच्या सुरक्षिततेची तपासणी केली जाते. प्रदूषण कमी करण्यासाठी १५ वर्षांपेक्षा जुन्या रिक्षांना २००६ पासून एलपीजी, तर २००९ पासून सीएनजी किट बसविणे सक्तीचे केले आहे. असे असतानाही वीस वर्षांनंतर रिक्षा बाद करण्याचा निर्णय अन्यायकारक असून, तो रद्द करावा, अशी मागणी पंचायतीच्या वतीने करण्यात आली.
रिक्षा पंचायतीच्या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. रिक्षाच्या वयाच्या निर्णयाचा पुनर्विचाराबाबत रिक्षा तंदुरुस्ती तपासणीच्या शास्त्रीय पद्धतीसह परिवहन अधिकाऱ्यांनी परिवहन प्राधिकरणासमोर प्रस्ताव ठेवावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली, अशी माहिती नितीन पवार यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2014 रोजी प्रकाशित
पुण्यात रिक्षाची वयोमर्यादा वाढविली जाण्याची शक्यता
सध्या पुण्यात रिक्षाची वयोमर्यादा वीस वर्षांची असून, ही वयोमर्यादा वाढल्यास अनेक रिक्षा मालक व चालकांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे.

First published on: 20-07-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw age limit demand