संजय जाधव
पुणे : एसटीने दिवाळीच्या काळात तिकीट दरात नुकतीच दहा टक्क्यांनी वाढ केली आहे. याचबरोबर खासगी प्रवासी बसच्या भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता रिक्षांनाही दिवाळीच्या काळात बोनस भाडेवाढ द्यावी, असा मुद्दा मांडण्यात आला आहे. रिक्षांना १० टक्के बोनस भाडेवाढ द्यावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीने केली आहे. दरम्यान, अशा प्रकारची भाडेवाढ करता येत नसल्याची भूमिका प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) घेतली आहे.
याबाबत रिक्षा पंचायतीचे सचिव नितीन पवार म्हणाले की, रिक्षा हे सार्वजनिक प्रवासी वाहन आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील प्रचंड वाहतूक कोंडी असलेल्या रस्त्यांवर दिवाळीच्या काळात प्रवाशांना रिक्षाचालक सेवा देत आहेत. सार्वजनिक प्रवासी वाहन असूनही रिक्षा चालकांना दिवाळीच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे विशेष उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात रिक्षाचे भाडेही बोनस म्हणून दहा टक्क्याने वाढवावे अशी आमची मागणी आहे.
आणखी वाचा-घरांची कोटीच्या कोटी उड्डाणे! पुण्यात आलिशान घरांना मागणी वाढली
रिक्षाची सेवा घेणाऱ्या प्रवाशांनी झालेल्या भाड्यापेक्षा अधिक ऐच्छिक दहा टक्के अधिकचे भाडे ७ नोव्हेंबरपासून चालकाला द्यावे. हे भाडे येत्या १८ नोव्हेंबरपर्यंत द्यावे. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून पुन्हा नेहमीचेच भाडे द्यावे. हा निर्णय होईपर्यंत दहा टक्के अतिरिक्त भाडे देण्यासाठी कोणतीही सक्ती नाही. निर्णय होईपर्यंत बोनस भाडे पूर्णपणे ऐच्छिक आहे याचे भान रिक्षाचालकांनी ठेवून त्याविषयी आग्रह धरू नये, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
रिक्षाची भाडेवाढ करावयाची असल्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मंजुरी लागते. त्यात महागाईचा दर, इंधन दर यासह इतर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय कोणतीही भाडेवाढ करता येत नाही. -संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी