पुणे : कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता दरम्यानच्या राजाराम पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल प्रस्तावित आहे. नदीवरील या पुलाच्या कामाला तातडीने गती द्यावी आणि निविदा प्रक्रिया राबवावी, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली.
प्रस्तावित कर्वेनगर ते सनसिटी या पुलासंदर्भात चंद्रकातदादा पाटील यांनी कर्वेनगर स्मशानभूमी येथे पाहाणी करून आढावा घेतला. आयुक्त विक्रम कुमार, प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, माजी नगरसेविका वृषाली चौधरी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानची वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी नदीवर पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातही यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कामाची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. प्रस्तावित पुलामुळे सिंहगड रोड आणि कोथरूड आणि कर्वेनगर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.