पुणे : जुन्नर तालुक्यातील सर्व रस्त्यांची नोंद घेऊन त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या उपक्रमाचा पहिला प्रयोग जुन्नर तालुक्यातील मौजे बोरी बुद्रुक येथे यशस्वी करण्यात आला. त्यामुळे बोरी बुद्रुक गाव रस्त्यांना सांकेतांक देवून जीआयएस नकाशावर स्थान देणारे राज्यातील पहिले गाव ठरले.
ग्रामपंचायत, महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून काढलेल्या शिवार फेरीत आधीच नकाशावर असलेले पाच रस्ते आणि नव्याने निश्चित झालेले ६९ पाणंद, शेतरस्ते, शिवरस्ते आणि वहिवाटीचे रस्ते यांचा समावेश करण्यात आला. एकूण ७४ रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन त्यांची ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर महसूल आणि भूमिअभिलेख विभागाच्या संयुक्त पथकाने या सर्व रस्त्यांचे सीमांकन करून जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर नोंद केल्याची माहिती जिल्हा प्रशासानकडून देण्यात आली.
या प्रक्रियेत गाव नकाशांवर असलेले आणि प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले सर्व प्रकारचे रस्ते नोंदवले जाणार आहेत. यात ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, पायमार्ग, शेतरस्ते, वहिवाटीचे रस्ते यांचा समावेश असेल. रस्त्याची लांबी, रुंदी, सुरुवात-शेवट, किती शेतकरी त्याचा वापर करतात, कोणत्या गटातून रस्ता जातो याचा तपशील त्यासाठी देणे बंधनकारक असणार आहे. ही सर्व माहिती माहिती १७ सप्टेंबरपासून प्रत्येक गावातील ग्रामसभेत ठेवली जाणार असून ग्रामसभेची मंजुरी घेणे अनिवार्य असेल. अतिक्रमित किंवा बंद रस्त्यांबाबत मंडळ स्तरावर रस्ता समितीच्या उपस्थितीत ‘रस्ता अदालत’ घेऊन निर्णय दिला जाणार आहे.
जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर नोंदणी
ग्रामसभेत मंजूर झालेल्या रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन उपाधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयास माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर अक्षांश-रेखांशासह नोंदणी होईल. परिणामी गावनिहाय नमुना १ (फ) मध्ये रस्त्यांना अधिकृत आणि कायदेशीर अभिलेख प्राप्त होणार आहे.
