शहरातील वाहतूक कोंडीला आणि रस्त्यांच्या दुरवस्थेला मेट्रोची कामे जबाबदार असल्याचा ठपका पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून ठेवण्यात आल्यानंतर महामेट्रोकडून रस्ते दुरुस्तीची कामे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. मेट्रो कामासाठी रस्त्यांवर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या (बॅरिकेड्स) काढण्यात आले असून नियमित दुरुस्ती, खड्डे बुजविणे, दुभाजकांची कामे करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, महापालिका आणि पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा महामेट्रोकडून फेरआढावाही घेतला जाणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: महासाथीच्या काळात ४७ टक्के महिला कायमस्वरूपी बेरोजगार

मेट्रोकडून कामाच्या ठिकाणी लावलेल्या लोखंडी जाळ्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ होऊन वाहतूक कोंडी होत आहे. काम सुरू नसताना आणि आवश्यकता नसतानाही मेट्रोकडून ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्याने मेट्रोवर कारवाई का करण्यात येऊ नये, असा खुलासा मागविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या संयुक्त पाहणी दौऱ्यात घेण्यात आला. त्यानंतर महामेट्रोकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>पुणे:पारपत्र पडताळणीला वेग; पोलिसांच्या तत्परतेमुळे २१ दिवसांत पारपत्र घरपोहोच

मेट्रोच्या कामासाठी अवजड यंत्रांचा वापर करण्यात आल्याने अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मेट्रोच्या कामांमुळे दुरवस्था झालेले रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी मेट्रोची आहे, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार महामेट्रोकडून कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याची कबुली देत कामे सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेजेस दुरुस्ती, मॅनहोलची दुरुस्ती, जलवाहिनी दुरुस्ती, पादचारी मार्गाची दुरुस्ती मेट्रो प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. वनाज ते गरवारे तसेच पिंपरी-चिंचवड ते आरटीओ-बंडगार्डन येथील कामे संपल्याने बॅरिकेड हटवून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे: निकृष्ट दर्जामुळे विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील भोजनगृहात आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोपोडी येथील एल्फिस्टन रस्ता ते एमएसईबी चौक आणि एल्फिस्टन रस्ता ते रेल्वे क्राॅसिंग रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. खडकी पोलीस स्थानक ते रेल्वे भुयारी मार्ग, साई मंदिर चौक, कल्याणीनगर, बंडगार्डन, पुणे रेल्वे स्थानक परिसरातही डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
मेट्रो कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी ट्रॅफिक वाॅर्डन वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आले असून महामेट्रोकडून उपलब्ध करून देण्यात आलेले २७२ ट्रॅफिक वाॅर्डन शहराच्या विविध भागात वाहतूक नियोजन करत आहेत. मेट्रो मार्गातील रस्त्यांची डागडुजी, पादचारी मार्ग, ड्रेनेजची झाकणे यांची नियमित दुरुस्ती महामेट्रोकडून करण्यात येणार असून खड्डे बुजविणे, दुभाजाकांची कामेही सुरू झाली आहेत. बंडगार्डन रस्ता, खडकी, कल्याणीनगर या ठिकाणी नवीन रस्ते करण्यात येत असून पादचारी मार्ग देखील पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.