मोटार बिघाडल्याच्या बतावणीने गंडा
मोटारीत तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी करून दुरुस्तीसाठी चालकांकडून पैसे उकळून त्यांना हातोहात फसवणूक करणारे भामटे जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर सक्रिय झाले आहेत. जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी या भामटय़ांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. धनकवडीतील एका ज्येष्ठ नागरिकाला फसवणुकीच्या अशा प्रकाराला नुकतेच सामोरे जावे लागले. रसायनी फाटय़ाजवळ मोटारीत बिघाड झाल्याची बतावणी करून त्यांच्याकडून चार हजार रुपये उकळून भामटय़ांनी त्यांना गंडविले.
धनकवडीतील गोविंदराव पाटीलनगर परिसरात राहणारे रवींद्र बबनराव शितोळे (वय ५९) यांच्यावर हा प्रसंग गुदरला. भामटय़ांनी केलेल्या बतावणीला शितोळे बळी पडले. त्यामुळे अशा पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून या रस्त्यावरील भामटय़ांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शितोळे यांच्या मेहुण्याची मुले उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त त्यांच्याकडे राहण्यासाठी आली होती. गेल्या रविवारी (८ मे) रवींद्र शितोळे आणि त्यांची पत्नी वैशाली मुलांना सोडण्यासाठी मुंबईला मोटारीने गेले होते. मुंबईहून ते जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने पुण्याच्या दिशेने येत होते.
रस्त्यावर घडलेल्या घटनेबाबत शितोळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, की रसायनी फाटय़ाजवळ धीरुभाई अंबानी रुग्णालयाजवळ दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मी मोटारीतून येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मला थांबण्याची सूचना केली. मराठी बोलणाऱ्या या दोघांनी मला मोटार रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितले. मोटारीच्या पुढील भागातून धूर येत असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे मी घाबरलो आणि तातडीने मोटार रस्त्याच्या कडेला घेतली. मोटारीचे बॉनेट उघडले. तेव्हा मला तेथे धूर दिसला नाही. त्या वेळी त्या दोघांपैकी एकाने बॉनेट उघडले आणि इंजिनवर त्यांच्याकडील स्प्रे मारला. काही क्षणात तेथे आग लागली आणि मोठय़ा प्रमाणावर धूर आला. मी आणि माझी पत्नी घाबरलो. त्यानंतर मोटारीतील पाण्याची बाटली घेऊन त्या दोघांनी आग विझविली. तुम्ही नशीबवान आहात म्हणून वाचलात. या परिसरात कालच एका मोटारीने पेट घेतला आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला, असे त्यांनी मला सांगितले.
मोटारीतील ऑइल पंपचा भाग खराब झाला आहे. मी वाहतूक व्यवसायातील आहे. तातडीने तुम्हाला तो पंप बदलून देतो, असे त्यातील एकाने सांगितले. त्यांच्या सांगण्यावर मी विश्वास ठेवला. भामटे तेथून ऑइलचा पंप आणण्यासाठी गेले. दहा मिनिटांत ते पुन्हा परत आले. आणलेल्या पंपाची किंमत चार हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. तेवढे पैसे जवळ नसल्याचे मी त्यांना सांगितले. त्यावर जवळच एटीएम केंद्र आहे. पैसे काढून आणा, अशी सूचना भामटय़ांनी केली. त्यानंतर मी त्यांना चार हजार रुपये काढून आणून दिले. दरम्यान, आमचे लक्ष नसल्याची संधी साधून पैसे घेऊन ते दोघे दुचाकीवरून पसार झाले. प्रत्यक्षात त्यांनी मोटारीसाठी सुटे भाग आणण्याचे बहाणा केला होता, असे शितोळे यांनी सांगितले.
शितोळे म्हणाले, की या घटनेनंतर आम्हाला धक्का बसला. पोलिसांकडे तक्रार न देता आम्ही पुण्यात आलो. अशा पद्धतीने दुसऱ्या वाहनचालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही ‘लोकसत्ता’शी संपर्क साधून आमची व्यथा मांडत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत यापूर्वी कोणी तक्रार केलेली नाही. मात्र, वाहनचालकांना अडवून या पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रकार घडून नयेत यासाठी मार्गावर आम्ही लक्ष ठेवू.
रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे</strong>

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbers active old pune mumbai highway
First published on: 18-05-2016 at 00:03 IST