पिंपरी : एका तरुणाला अंधारात अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल, चांदीचे ब्रॅस्लेट आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरल्याची घटना रावेत मधील शिंदेवस्तीत घडली. आक्याभाई उर्फ आकाश सुभाष आल्हाट (२९, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नियाज मोहम्मद अन्सारी (३०, रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी हे रविवारी रात्री शिंदेवस्तीकडे कच्च्या रस्त्याने जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चार जणांनी अन्सारी यांना अडवले. यातील एका आरोपीने ‘आक्याभाई’ असे नाव सांगून अन्सारी यांच्या खिशातील मोबाइल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. विरोध केल्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि छत्रीच्या दांड्याने मारहाण केली. घटनास्थळी मदतीला आलेल्या दोन तरुणांनाही आरोपीने कोयता दाखविला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

वाकडमध्ये भाडेकरूकडून सुरक्षा रक्षकाला गंडा

गृहनिर्माण सोसायटीमधील भाडेकरूने वृद्ध सुरक्षा रक्षकाची फसवणूक केली. त्यांच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करून त्याआधारे सहा लाख ५५ हजार रुपयांची चारचाकी मोटार खरेदी केली. ही घटना थेरगावमधील संतोषनगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार भाडेकरूविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ पासून थेरगाव येथील एका गृहनिर्माण सोसायटीत आरोपी भाड्याने राहण्यास आला होता. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन खोट्या कागदपत्रांद्वारे मोबाइल सिमकार्ड, बँक खाते, क्रेडिट कार्ड सुरू केले. याच नावाने बाणेर येथून मोटार खरेदी करत सहा लाख ५५ हजारांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

सांगवीत पिस्तुल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

पिस्तुल बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई सोमवारी औंध जिल्हा रुग्णालयाच्या समोर करण्यात आली.संजय दिलीप घाडगे (१९, सुस, मुळशी), रोहन हनुमंत ओव्हाळ (२०, सुस, मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई आकाश खंडागळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध जिल्हा रुग्णालयाच्या समोर जुनी सांगवी येथे दोघेजण दुचाकीवरून पिस्तुल घेऊन आल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संजय आणि रोहन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल, ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आणि ५० हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त केली आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

निगडीत गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

बेकायदेशीरपणे गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या एकास निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई निगडी येथील अंकुश चौकात करण्यात आली. जैनुद्दिन अब्बास शेख (३५, रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई जय दौंडकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या टपरीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने करवाई केली. या करवाई मध्ये प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, तंबाखू यासह रोख रक्कम आणि मोबाईल मिळून एकूण ३६ हजार ६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.