लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ऐन दिवाळीच्या मुर्हुतावरच वानवडी परिसरात एका सराफी व्यावसायिकावर गोळ्या झाडून सोने लुटून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सराफावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून, त्यातील एक गोळी तोंडाला लागली असून दोन गोळ्या पायाला लागल्या आहेत. त्यात सराफ व्यावसायिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. सराफाकडील दोन तोळे सोने गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रतीक मदनलाल ओसवाल (वय ३५) असे जखमी झालेल्या सराफी व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-हा आमचा ‘इलाका’ म्हणत तृतीयपंथीयांकडून उकळली खंडणी; पाच जण अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप हे सराफी व्यावसायिक असून, त्यांचे सय्यदनगर परिसरात सोने-चांदी विक्रीचे दुकान असून ते वानवडी परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून दुकानातील सोने बॅगेत घेऊन दुचाकीवरून घराकडे निघाले होते. बी. टी. कवडे रस्त्यावर आल्यानंतर एका मॉलसमोर भर वर्दळीच्या ठिकाणीच दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या तोंडाला तर, दोन उजव्या पायातील मांडीला लागल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांची धावाधाव झाली. त्याचवेळी याची माहिती नियत्रंण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर वानवडी पोलिसांना घटनेबाबत सांगण्यात आले. गोळीबार झाल्याचे समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वानवडी पोलिसांनी येथे धाव घेतली. दरम्यान, हल्लेखोर पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.