पुणे : ‘जगाला शांतता हवी असेल, तर हिंदू जीवनविचारांच्या आधारावरच पुढे जावे लागेल. याचे प्रारूप येत्या २५ पंचवीस वर्षांत संघ विकसित करील,’ अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण संयोजक शरदराव ढोले यांनी रविवारी दिली.

संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या समन्वय बैठकीच्या समारोप सत्रात शरदराव ढोले बोलत होते. संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव उपस्थित होते. बैठकीला संघ प्रेरित ४९ संघटनांचे ३२८ कार्यकर्ते उपस्थित होते.

संघाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व अधोरेखित करताना ढोले म्हणाले, ‘वैश्विक पटलावर भारताला विकसित आणि मार्गदर्शक बनायचे असेल, तर हिंदू मूल्याधिष्ठित समाज निर्माण करावा लागेल. त्याची सुरुवात म्हणजे संघ शताब्दी आहे. समाजातील सज्जनशक्ती आणि लाखो स्वयंसेवक पंच परिवर्तन जीवनात उतरवतील, तेव्हा त्यातून संपूर्ण देशात समाज परिवर्तनाची सुरुवात होईल.’

डिसेंबरमध्ये ‘गृहसंवाद’ अभियान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील कार्यक्रमांची सुरुवात विजयादशमी म्हणजे २ ऑक्टोबरपासून होत आहे. त्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातही मंडल आणि नगर स्तरावर शस्त्रपूजन उत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वाधिक संख्येने गणवेशधारी स्वयंसेवक असतील, असे प्रयत्न केले जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिसेंबर महिन्यात घरोघरी जाऊन संघ समजावून सांगण्याचे काम गृहसंवाद अभियानातून होणार आहे. तर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात प्रांतभर हिंदू संमेलने आयोजित करण्यात येतील. समाजाच्या सहभागातून कुटुंब प्रबोधन, समरसतापूर्ण व्यवहार, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरिक शिष्टाचार आणि ‘स्व’-बोध या पंच परिवर्तन बिंदूंवर कार्य केले जाणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.