पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे यांना पक्षशिस्तीचे उल्लंघन केले म्हणून नोटीस बजाविण्यात आली आहे. पाटील यांना सात दिवसांत खुलासा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चाकणकर यांच्यावर टीका केली होती. चाकणकर यांच्याबाबत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे, असे स्पष्ट करत पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी त्यांना नोटीस बजावित सात दिवसांच्या आत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सात दिवसांमध्ये खुलासा करावा अन्यथा आपल्याविरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे या नोटिशीमध्ये म्हटले आहे. या नोटिशीची प्रत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात आली आहे.
दरम्यान, पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केलेल्या माधवी खंडाळकर यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले.
खुलासा पत्रात सर्व पुरावे देणार
‘पक्षाने नोटीस नाही, तर खुलासा पत्र दिले आहे. कायदेशीर खुलासा आणि पत्राला उत्तर देणार आहे. सत्य बाजू त्यामधून मांडेन. माधवी खंडाळकर यांनी मारहाण झाल्याची तक्रार कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आली, याचा शोध सुरू आहे. लवकरच ही माहिती समोर येईल. खंडाळकर यांनी कोणाला दूरध्वनी केले याचे तांत्रिक विश्लेषण (सीडीआर) पोलिसांकडून घेणार आहे. खंडाळकर यांनी दाखल केलेला गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून केला, याचा तपास करण्याची विनंती पोलीस आयुक्तांकडे केली आहे.’ असे पाटील यांनी सांगितले.
‘महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. आयोग वेगळा आणि पक्ष वेगळा आहे. यापूर्वीही समाजमाध्यमावर एका मुलीने माझ्या विरोधात पोस्ट टाकली होती. ती मुलगी महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या ओळखीची होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याचे सर्व पुरावे देणार आहे,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.
