आज राज्यभरात छत्रपती शिवाजीमहाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अनेकांना गडावरच थांबवण्यात आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी गडकिल्ले संवर्धनाच्या मुद्द्यावरूनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “देशात आजही ‘पेगासस’चा वापर सुरू”; संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले, “देशातील प्रमुख उद्योगपती…”

काय म्हणाले संभाजीराजे?

किल्ले शिवनेरीवर होणारा महोत्सव हा शासकीय महोत्सव आहे. तरी लोकांना मोठ्या प्रमाणात गडावर सोडण्यात आलं आहे. आज मीसुद्धा पायी चालत गडावर पोहोचलो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गडावर पोहोचले. मध्यरात्रीपासून लोक गडावर चालत येत आहेत. त्यामुळे मी लोकांबरोबर जाऊन दर्शन घेणार, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.

नियोजनावरून व्यक्त केली नाराजी

पुढे बोलताना त्यांनी जयंती उत्सवाच्या नियोजनावरूनही नाराजी व्यक्त केली. ”जर सरकारला शासकीय शिवजयंती साजरी करायची असेल तर करावी, मग अशा परिस्थितीत लोकांना गडावर का सोडता? हा गड लहान आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे लोकांना आधीच सांगा की शासकीय शिवजयंती साजरी होईपर्यंत गडावर चढू नका, आता हजारो लोकं दर्शनासाठी वाट बघत आहेत”, असेही ते म्हणाले. तसेच ”रायगडावर शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याने तिथे राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आली होती. मग शिवनेरीवर वेगळा नियम का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चालत शिवनेरीवर यावं”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – अमित शाहांकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठं भाष्य, म्हणाले “या निकालाने…”

गडकिल्ले संवर्धनावरून सरकारला सुनावले बोल

”देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी मागे लागून रायगडाचं संवर्धनासाठी समिती स्थापन करून घेतली. मग अशी समितीत इतर किल्ल्यांसाठी का होत नाही? असा प्रश्न आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना विचारायला हवा. शिवाजी महाराजांचं नाव काय फक्त शिवजयंतीलाच घ्याचचं का? गडकिल्ले संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्यांशी तीन वेळा चर्चा केली. यापूर्वीही अनेक मुख्यमंत्र्यांशी मी बोललो. मात्र, अद्याप काहीही झालं नाही. माझ्या प्रत्येक भाषणात हा विषय असतोच”, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji raje expressed displeasure over management on shiv jayanti programme at shivneri fort spb
First published on: 19-02-2023 at 09:54 IST