पुणे : ‘भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. दक्षिण-पूर्व आशिया, आफ्रिका आणि मध्य-पूर्वेतील देश भारतीय संरक्षण प्रणालींमध्ये विशेष स्वारस्य दाखवत आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षांत संरक्षण प्रणालींच्या निर्यातीत वाढ होईल,’ असा विश्वास संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी शनिवारी व्यक्त केला. संरक्षण निर्यातीचा टप्पा सन २०२८-२९ पर्यंत ५० हजार कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष ‘आत्मनिर्भर भारत’मुळे सहज साध्य होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खडकवासला येथे ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी’च्या (डाएट) पदवीदान समारंभात डॉ. कामत यांच्या हस्ते ‘डाएट’च्या २९८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘डायट’चे कुलगुरू डॉ. बीएचव्हीएस नारायण मूर्ती या वेळी उपस्थित होते.

कमात म्हणाले,‘देशाच्या संरक्षण निर्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात २३ हजार ६२२ कोटींपेक्षा जास्त झाली. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.०४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे जो प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून येत्या दोन-तीन वर्षांत संरक्षण निर्यातीचे प्रमाण दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. ‘पिनाका,’ ‘ब्राह्मोस’ आणि ‘आकाश’ क्षेपणास्त्र, स्वदेशी बनावटीची ॲडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टम (एटीएजीएस) तोफ यांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तसेच दक्षिण-पूर्व आशिया, आफ्रिका आणि मध्य-पूर्वेतील देश भारतीय बनावटीच्या संरक्षण प्रणालींमध्ये विशेष स्वारस्य दाखवत आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षांत संरक्षण प्रणालींच्या निर्यातीत वाढ होईल.’

ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘स्वदेशी’चा वापर

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि आकाशतीर ही संरक्षण प्रणाली अशा स्वदेशी उत्पादनांनी निर्णायक भूमिका बजावली. सुखोई विमानातून ‘ब्राह्मोस’ डागण्यात आले, तर संरक्षणासाठी ‘आकाशतीर’ ही ॲन्टी ड्रोन प्रणाली आणि मीडियम रेंज सर्फेस-टू-एअर मिसाईल यांचा वापर करण्यात आला होता. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा देशाच्या संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि उत्पादनाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे, असेही समीर कामत यांनी सांगितले.

‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ मोहीम नव्हती. देशाच्या सामरिक ताकदीचा तो पुरावा आहे. ही मोहीम यशस्वी करण्यात सैन्याच्या शौर्या इतकाच शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या आधुनिक स्वदेशी तंत्रनाचाही वाटा महत्वाचा होता.- समीर कामत, अध्यक्ष, डीआरडीओ