पुणे : ‘निलगिरीचा परिसर थेट राधानगरी, चांदोली जंगलांमध्ये येत नाही. मात्र, पश्चिम घाटातील सह्याद्री-कोकण वनसाखळी आणि ‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी परिसर महत्त्वाचा आहे. वाघांच्या संवर्धनासाठी निलगिरीचे जंगल गरजेचे आहे,’ असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक, वन्यजीव चित्रपट निर्माते संदेश कडूर यांनी व्यक्त केले.
‘फेलिस फिल्म्स’च्या वतीने पश्चिम घाटाच्या परिसंस्थेतील निलगिरीच्या जंगलाचे पर्यावरणीय आणि जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व अधोरेखित करणारा रोहिणी निलेकणी प्रस्तुत आणि संदेश कडूर दिग्दर्शित ‘निलगिरीस – अ शॅर्ड वाइल्डरनेस’ हा माहितीपट अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘अनेक वेळा वाघांचे स्थलांतर निलगिरी भागातून सुरू होते. पुढे सिगूर पठार, मदुमलाई, सत्यमंगलम, बंदीपूर आणि नागरहोलसारख्या अभयारण्यामार्गे कर्नाटकातील मध्यवर्ती वनविकास क्षेत्रात ते प्रवेश करतात. त्यानंतर काली, भीमगड, म्हादई अभयारण्ये आणि शेवटी राधानगरी-चांदोली अभयारण्यांपर्यंत वाघांचे स्थलांतर होते. निलगिरीसारखी सलग आणि सातत्यपूर्ण वनसाखळी वाघांच्या या दीर्घ प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.’ असे कडूर यांनी सांगितले.
कडूर म्हणाले, ‘निलगिरीचे जंगल हे वाघ, हत्ती यांसारख्या मोठ्या सस्तन प्राण्यांच्या स्थलांतरासाठी, वंशपरंपरेच्या जतनासाठी अत्यंत महत्त्वाचा वन्यजीव संचारमार्ग (कॉरिडॉर) म्हणून ओळखले जाते. या जंगलात अत्यंत दुर्मीळ ‘ब्लॅक पँथर’ही आढळतो. निलगिरीचा परिसर ‘निलगिरी तुपाटी’, ‘शोलाय’ अरण्य, ‘सायप्रस’ वृक्षसंपदा आणि अनेक औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. या जंगलात शेकडो प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे तसेच जैवविविधतेने समृद्ध असे वन्यजीव प्राण्यांचे अधिवास आढळतात. निलगिरीचे जंगल देशातील सर्वांत प्राचीन जैविक संवर्धन क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते.’
मानवी हस्तक्षेप वाढल्याने निलगिरीच्या जंगलातील परिसंस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. तेथील अत्यंत दुर्मीळ प्रजाती आणि जैवविविधतेवर एक प्रकारचा दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे समाज, शासन आणि बाजारपेठ यांनी एकत्र येऊन निलगिरीच्या परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. ‘निलगिरीस – अ शॅर्ड वाइल्डरनेस’ या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.-संदेश कडूर, वन्यजीव चित्रपट निर्माते