शस्त्रास्त्र कायद्याखाली शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात बुधवारी सकाळी येरवडा कारागृहात आणण्यात आले. याच गुन्ह्य़ात शिक्षा झालेला युसूफ नळवाला यालाही संजयसोबतच आणण्यात आले. ‘सुरक्षिततेच्या कारणास्तव संजय दत्त याला एका स्वतंत्र खोलीत वेगळे ठेवले जाणार आहे. कारागृहात त्याला योग्य सुरक्षा पुरविली जाईल,’ अशी माहिती राज्याच्या कारागृह विभागाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांनी दिली.
न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यातील दीड वर्षे शिक्षा त्याने भोगली असून उर्वरित रिक्षा भोगण्यासाठी तो मुंबईतील टाडा न्यायालयासमोर १६ मे रोजी हजर झाला होता. तेव्हापासून त्याला मुंबई येथील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. संजय दत्तला येरवडा कारागृहात लगेच हालविण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, पाच दिवस उलटून गेले तरी तो आर्थर रोड कारागृहातच असल्यामुळे त्याचा मुक्काम या ठिकाणी लांबण्याची शक्यता होती. पण, बुधवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तामध्ये संजय दत्त आणि त्याचा मित्र युसूफ नळवाला यांना येरवडा कारागृहात आणण्यात आले.
याबाबत बोरवणकर यांनी सांगितले की, संजय दत्तला बुधवारी सकाळी सात वाजता कडक सुरक्षा व्यवस्थेत येरवडा कारगृहात आणण्यात आले. संजयला सुरक्षिततेची गरज असल्याची आम्हाला जाणीव आहे. त्यादृष्टीने त्याला कारागृहात सुरक्षा पुरविली जाईल. न्यायालयाने एक महिन्यापर्यंत घरचे अन्न देण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयासमोर हजर होताना माध्यमांमुळे तो आत जाऊ शकत नव्हता. हे सर्व आम्ही पाहिले होते. त्याचबरोबर गेल्या वेळी त्याला येरवडा कारागृहात आणताना माध्यमांच्या मोटारी त्याचा कशा पाठलाग करत होत्या, या गोष्टी माहिती होत्या. सगळ्यांच्या जीविताचा धोका लक्षात घेऊन त्याला गुप्तपणे आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या सुरक्षिततेसाठी कारागृहातही त्याला सुरक्षा दिली जाणार आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे त्याला कोठे ठेवले जाणार आहे, याची माहिती दिली जाणार नाही.
येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले की, संजय दत्त काय काम करणार हे अद्याप ठरविलेले नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याचे दैनंदीन दिनक्रम इतर कैद्यांप्रमाणेच असेल. पण त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र खोलीत ठेवल्यामुळे त्याचा दिनक्रम तो एकटाच करेल. कारागृहातील कैदी हे सकाळी साडेसातपर्यंत तयार होऊन नाष्टा करतात. त्यानंतर त्यांना सकाळी साडेअकरा वाजता दुपारचे जेवन दिले जाते. त्यानंतर ते त्यांचे काम साडेचापर्यंत करून परत येतात. रात्रीचे जेवन साडेसहा वाजता दिले जाते.
कैदी नंबर- १६६५६
संजय दत्तला बुधवारी येरवडा कारागृहात आणण्यात आल्यानंतर सायंकाळी त्याला कैदी नंबर देण्यात आला. संजय येरवडा कारागृहातील १६६५६ नंबरचा कैदी ठरला आहे. त्याला कोणते काम दिले जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. संजय दत्त याला फाशीयार्डच्या पाठीमागील बराकीमध्ये स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे.