उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी़ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहेत. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या अनेक राजकीय व्यासपीठांवर दिसू लागल्या आहेत. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमत्री अजित पवार हे सातत्याने बारामतीत जनसंपर्क वाढवत आहेत. बारामतीतल्या लहान-मोठ्या राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. अजित पवार हे आगामी निवडणुकीत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंविरोधात मोर्चेबांधणी करत आहेत. सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत जिंकवण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न चालू असल्याचं बोललं जात आहे. अशातच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, बारामती मतदारसंघातून, जनतेमधून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून मागणी होत आहे की, सुनेत्रा पवार यांनी लोकसभा लढवावी.

दरम्यान, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होईल, असं वक्तव्य भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी केलं आहे. संजय काकडे म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढत होईल, तशीच सध्या चर्चा चालू आहे. त्याचबरोबर सुनेत्रा वहिणी निवडून यायला काहीच अडचण नाही असं चित्र सध्या दिसतंय. मागील लोकसभा निवडणुकीत खडकवासला भागात भाजपाला मोठं मताधिक्य मिळालं होतं. तर भोर, पुरंदर आणि दौंडमध्येदेखील भाजपा उमेदवाराला सुप्रिया सुळेंपेक्षा अधिक मतं मिळाली होती. राहिला प्रश्न बारामतीचा तर बारामतीत अजित पवारांचं मोठं वजन आहे. अजित पवार स्वतः तिथे लीड घेतील.

भाजपा नेते संजय काकडे म्हणाले, तरुण मतदारांना अजित पवार हवे आहेत. इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोन नेत्यांचा प्रभाव आहे. हे दोन्ही नेते आत्ता आमच्याबरोबर आहेत. हे दोन्ही नेते आगामी लोकसभेला राष्ट्रवादीसाठी काम करतील. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच मोठे नेते आमच्याबरोबर आहेत. केवळ काँग्रेसचे संजय जगताप, संग्राम थोपटे आणि स्वतः सुप्रिया सुळे हे तीनच नेते त्या बाजूला (महाविकास आघाडी) आहेत. हे तीन नेते सोडले तर तिथल्या कार्यकर्त्यांना, मतदारांना चौथा नेता दिसत नाही. रमेश थोरातांसारखा नेता निवडणुकीनंतर पुढे कुठे जातो माहिती नाही.

“महायुतीचं पारडं जड”

भाजपाचे माजी खासदार म्हणाले, महायुतीतली नेत्यांची फळी पाहिली तर लक्षात येईल की, सुनेत्रा वहिणी मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभा निवडणूक जिंकतील. वहिणींसाठी वातावरण खूप चांगलं आहे. त्याच्या जोडीला अजित पवारांनी मतदारसंघात केलेलं कामही आहे. आमच्या पक्षाचा पारंपरिक मतदार अजित पवारांबरोबर आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीत भाजपा उमेदवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात जो फरक होता तो मिटून सुनेत्रा पवार आघाडी घेतील. उदाहरण म्हणून २०१४ च्या निवडणुकीकडे पाहता येईल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार महादेव जानकर ५७ हजार मतांनी पडले होते. २०१९ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे १.४७ लाख मतांनी निवडून आल्या होत्या. परंतु, सुप्रिया सुळेंकडे जी लाख-दिड लाख मतं अधिक होती ती अजित पवारांमुळे त्यांना मिळाली होती. आता अजित पवार आमच्याबरोबर असल्याने युतीचं पारडं जड आहे.

हे ही वाचा >> “त्या हल्ल्याला राजकीय झालर”, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य; रोख कोणाकडे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय काकडे म्हणाले, अजित पवारांसह त्यांचे समर्थक आमदार राहुल कुल, आमदार दत्तात्रय भरणे यांची मतंदेखील सुनेत्रा पवार यांना मिळतील. त्यामुळे अजित पवार ज्याला उमेदवारी देतील तोच उमेदवार जिंकेल असं आत्ता तरी वाटतंय. यासह भाजपाची चार लाख पारंपरिक मतं अजित पवारांच्या उमेदवाराला मिळतील. अजित पवारांची स्वतःची तीन ते साडेतीन लाख मतं आहेत. पुरंदरचे संजय जगताप, विजय शिवतारे यांची मतंदेखील आमच्याकडे आहेत. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा वहिणींचं पारडं जड आहे.