पुणे : शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, असेही न्यायालायने सांगितले आहे. फुटीर ४० आमदारांना यानिमित्ताने फाशी मिळणार आहे. मात्र फाशी देण्याचे अधिकार असलेले जल्लाद म्हणजे विधानसभा अध्यक्ष त्याबाबतचा निर्णय घेत नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर शनिवारी टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नवाब मलिक नकोत, असे भाजप सांगते. मात्र दहशतवाद्यांशी आर्थिक संबंधांचा आरोप असलेले प्रफुल्ल पटेल, यांच्यावर कारवाई का होत नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.
ठाकरे गटाच्या वतीने जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अणित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली.
हेही वाचा >>> “मिर्चीचं गाजर झालं का?”, प्रफुल्ल पटेलांप्रकरणी संजय राऊत बरसले, म्हणाले, “आपल्या देशाचे पंतप्रधान…”
शिवसेना बाळासाहेबांची आहे. शिवसेनेला जन्माला आली तेंव्हा निवडणूक आयोग नव्हता. उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख आहेत. मात्र त्यानंतरही निवडणूक आयोग एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना ठरवित आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत हाच प्रकार आहे. शिवसेनेला घाबरून भाजपने ती फोडली. फुटीर ४० आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. विधानसभा अध्यक्ष घटनात्मक पद असल्याने त्याबाबत बोलता येत नाही. टीका केली की हक्कभंग होता. मात्र मी घाबरत नाही. चाळीस आमदार फाशी जाणार आहेत. मात्र जल्लाद त्यांना फाशी देत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
शिवसेनेला घाबरूनच भाजपने शिवसेनेला फोडले. मात्र देशाला, राज्याला आणि शिवसेनेला लागलेली पनवती २०२४ नंतर दिसणार नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला. ते म्हणाले की, गुजरात लाॅबी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला बदनाम आणि संपविण्याचे काम करत असून राज्यातील उद्योग गुजरातला पळविले जात असून गुजरातमधील अमली पदार्थ राज्यात पाठविले जात आहेत. चार राज्यातील निवडणुकानंतर केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता येईल, अशी हमी पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. मोदी सध्या सातत्याने गॅरेंटी, गॅरेंटी करत आहेत. मात्र यापूर्वीच्या निवडणुकीतल दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची गॅरेंटी ते का देत नाहीत. नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख, दहशतावादाचा बिमोड, काळा पैसा असी आश्वासने दिली. मोदी हिंदुत्वाची गॅरेंटी का देत नाहीत, अशी विचारणा राऊत यांनी केली.
हेही वाचा >>> छगन भुजबळ का म्हणाले, “कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या!”
या तर व्हिलनताई ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ.नीलम गोऱ्हे यांचा उल्लेख राऊत यांनी व्हिलनताई असा केला. तसेच ‘एक फुल आणि दोन डाऊटफूल’ असा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्या फडणवीस यांनी मेळाव्यात जमलेली ‘शिल्लक’ सेना पहावी म्हणजे त्यांना वस्तुस्थिती कळले. भाजपमध्ये हिंमत असेल तर एक तरी निवडणूक त्यांनी बॅलेट पेपवरवर घेऊन दाखवावी, असे आव्हानही राऊत यांनी दिले.