नवाब मलिकप्रकरणी राज्यातील वातावरण तापलेलं असताना आता प्रफुल्ल पटेलांविरोधात रान पेटले आहे. नवाब मलिकांना सत्तेत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दर्शवला. मग दाऊदशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेलांसोबत कशी काय हातमिळवणी केली, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धारेवर धरलं आहे. ते आज (९ डिसेंबर) पुण्यात बोलत होते.
“१२ सप्टेंबर २०२२ रोजी प्रफुल्ल पटेलांचं स्वागत कोणी केलं? इक्बाल मिर्ची कोण आहे? इक्बाल मिर्ची हा मुंबईतल्या बॉम्ब स्फोटातला खरा सूत्रधार, दाऊदचा उजवा हात. मुंबईत १२ बॉम्ब स्फोट झाले. या बॉम्ब स्फोटामागे आर्थिक ताकद उभी करणारा हा इक्बाल मिरची. या इक्बाल मिर्चीकडून प्रफुल्ल पटेल आणि कंपनीने साडेचारशे कोटींची जमीन खरेदी केल्याचं कागदावर आहे. हे अमित शाह सांगत होते कालपर्यंत. ये कैसा हो गया ऐसा. जिस इक्बाल मिर्ची के उपर लुक आऊट नोटीस है, उसके साथ प्रफुल्ल पटेल कैसा व्यवहार कर सकता है?”, असं संजय राऊत अमित शाहांची नक्कल करत म्हणाले.
हेही वाचा >> आता पटेलप्रकरणी भाजप लक्ष्य; इक्बाल मिर्चीशी संबंधांवरून मविआ आक्रमक
“त्यांचा एक प्रवक्ता संबित पात्रा त्यावेळेला सोनिया गांधींना प्रश्न विचारत होता की प्रफुल्ल पटेलांचे दाऊदशी संबंध आहेत, मग कसं मंत्रिमंडळात घेतलंत? अरे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात सांगितलं की, काँग्रेसमधील काही लोक मिर्ची व्यापार करतात. आता त्या मिर्चीचं गाजर झालं का? दाऊदला आणि त्याच्याशी संबंधित लोकांना तुम्ही चिरडून टाकणार होतात, पण त्याच परम आदरणीय प्रफुल्ल पटेल हे दोन दिवसांपूर्वी अमित शाहांना भेटले. अमित शाहांनी त्यांचं हसत हसत स्वागत केलं. महाराष्ट्रातील हे ढोंग नष्ट करायचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
प्रफुल्ल पटेल लक्ष्य का?
कुख्यात दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरून आमदार नवाब मलिक यांच्या महायुतीमधील प्रवेशास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला असतानाच दाऊदचाच साथिदार इक्बाल मिर्चीशी आर्थिक संबंध असणारे प्रफुल पटेल भाजपला कसे चालतात, असा सवाल करीत काँग्रेस आणि ठाकरे गटाने शुक्रवारी भाजपची कोंडी केली. मलिक यांच्याप्रमाणेच पटेल यांच्याबाबतही तुमच्या भावना तीव्र आहेत का, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आणि लागोपाठ दुसऱ्या दिवशी भाजपला अडचणीत आणले.