इंदापूर : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरमधील सराटी येथे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामी आला. हा सोहळा मंगळवारी सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. हा वैष्णवांचा मेळा गोकुळीचा ओढा येथे पहिली विश्रांती घेऊन विठ्ठलवाडी, वडापुरी, सुरवड असा टप्पा पार करत दुपारच्या विश्रांतीसाठी बावडा येथे दाखल झाला. भक्तिमय वातावरणात बावडा ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. पावसाळी वातावरण असल्याने बावडेकरांचा आनंद पालखी सोहळ्याचे स्वागत करताना द्विगुणित झाला. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन बाजारपेठेतून बाजारतळावर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपात आणली. पादुकांची आरती करण्यात आली.
बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या रत्नाई निवासस्थानी हजारो वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. या वेळी पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांचा पाटील कुटुंब व ग्रामस्थांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बावडा येथील दुपारचा मुक्काम उरकून पालखीने रात्रीच्या मुक्कामासाठी सराटीकडे प्रस्थान ठेवले. या वेळी बावडा ग्रामस्थांनी गावाच्या वेशीपर्यंत जाऊन पालखीला निरोप दिला.
गेल्या महिन्यापासून इंदापूर तालुक्यात पाऊस पडल्याने सर्वत्र हिरवळ पसरली आहे. या वातावरणात मुखी अभंग असा अनुभव घेत सोहळा सराटी मुक्कामी विसावला. पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील हा शेवटचा मुक्काम होता. मंगळवारी सकाळी पादुकांच्या नीरा स्नानानंतर हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.