संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी भक्तीरसाची पर्वणीच असते. पालखी सोहळ्यात सेवा करायला मिळावी, यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. देहूपासून पंढरपूर पालखी मार्गावर आपापल्यापरिने अनेकजण वेगवेगळ्या सेवा करण्यासाठी उत्सुक असतात.  यातीलच एक  म्हणजे  पालखीच्या रथाला बैलजोडीची सेवा देणे. पालखीला बैलजोडी देणे हा एक मान समजला जातो. यंदा १६ जुलैला देहूतून आळंदीसाठी प्रस्थान ठेवणाऱ्या जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला बैलजोडी देण्याचा मान भानुदास खांदवे आणि अप्पासाहेब लोखंडे या शेतकऱ्यांना मिळाला आहे. हवेली तालुक्यातील लोहगाव येथील भानुदास यांची ‘सर्जा-राजा’ तर खेड तालुक्यातील चिंबळीच्या अप्पासाहेब यांची ‘माणिक-राजा’ ही बैलजोडी यंदा देहू ते पंढरपूर दरम्यान तुकोबांचा रथ ओढणार आहे. बैलजोडीला मान मिळाल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. तुकोबांची पालखीचा हा मान मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी चिंबळीकरांनी फटाके फोडल्याचे पाहायला मिळाले. फटाक्यांसोबत भंडारा उधळत आनंद साजरा करण्यात आला. देहू संस्थानाकडे बैलजोडीचा मान मिळवण्यासाठी १८ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते.

यापैकी दोन बैलजोडींच्या नावावर संस्थानाने आज शिक्कामोर्तब केले. यावेळी मान मिळालेल्या बैलजोडीची पूजा करण्यात आली. तसेच तुकोबांची पालखी ओढण्याचा जल्लोषही साजरा करण्यात आला. राजा आणि माणिक या जोडीची कुटुंबातील सर्वच जण काळजी घेतात. तीन भाऊ, पाच मुलं, सुना,आणि आई अशी आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे. आमच्या बैलजोडीला पालखी ओढण्याचा मान मिळाल्यामुळे कुटुंबियांसह संपूर्ण गावाला आनंद झाला असल्याचं मत अप्पासाहेब यांनी व्यक्त केले.