टँकर, रुग्णवाहिका सज्ज; वारीसाठी केरोसीन, धान्यपुरवठा

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जिल्ह्य़ातील तयारी पूर्ण झाली असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी अकरा खात्यांचे ६०९ अधिकारी आणि ६,६१२ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. जिल्ह्य़ातील आषाढी वारीसाठी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंगळवारी दिली.

वारीच्या काळात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि शासकीय असे एकूण ७८ टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच ११३ रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात पंढरपूपर्यंत पुण्यातून अग्निशामक दलाचे दोन बंब पाठविण्यात येणार आहेत.

पालखी सोहळ्यातील व्यवस्थांसाठी काही स्वयंसेवी संस्थांनी देखील पुढाकार घेतला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे सुमारे बाराशे स्वयंसेवक प्रत्येक पालखी मुक्कामानंतर त्या त्या भागाची स्वच्छता करणार आहेत. सेवा सहयोग फाउंडेशनच्या अडीचशे स्वयंसेवकांकडून सॅनिटायझर्स स्प्रे वाटण्यात येणार असून स्वच्छता यंत्राने (व्हॅक्युम क्लीनर) स्वच्छता केली जाणार आहे. वारकऱ्यांना आठ टँकरमधून ९३ हजार लिटर केरोसीन आणि २६ हजार दोनशे गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जाणार आहे. याबरोबरच दूध-साखर यांचा पुरवठा केला जाणार आहे.

वारीदरम्यान प्रत्येक दिंडीच्या नावाने गॅस सिलिंडरचे खाते उघडले जाणार असून त्या खात्यावरच गॅसचे अनुदान मिळणार आहे. साखर व केरोसीनच्या कार्डचे केंद्रीकरण करण्यात आले असून एकच कार्ड दिले जाणार आहे. तेच कार्ड सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्य़ात चालेल, असे राव यांनी सांगितले.

पालखीचा कालावधी

  • संत तुकाराम महाराजांची पालखी १६ ते २९ जून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १७ ते २४ जून या कालावधीत जिल्ह्य़ात असेल.