पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी एका पोर्श गाडीने बेदरकारपणे एका दुचाकीला उडवलं. त्यामुळे या दुचाकीवर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात घडला त्याचदिवशी सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले होते. या तपासणीत फेरफार केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अपघाताला जबाबदार असलेल्या असलेल्या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केलं आहे हे तपासण्यासाठी हे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यावेळी अल्कोहोल न घेतलेल्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने म्हणून दाखवण्यात आले. परिणामी अहवालात त्याच्या शरीरात अल्कोहोल नसल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्याच्या रक्ताची पुन्हा तपासणी करण्यात आली. दुसऱ्यांदा झालेल्या चाचणीत त्याच्या शरीरात अल्कोहोल आढळलं. तसंच, डीएनए चाचणीत दोन्ही चाचण्यातील रक्त नमुने वेगवेगळे असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे आरोपी अल्पवयीन मुलाचे संरक्षण करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी पुराव्यांशी छेडछाड केली असल्याचा संशय तपासकर्त्यांना आला.

हेही वाचा >> VIDEO : “पुणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचायला माझ्याकडे पैसे नाहीत”, रॅप साँग बनवणाऱ्या सोशल इन्फ्लुएन्सरची पोलिसांना विनंती

डॉक्टरांची चौकशी सुरू

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर असं या डॉक्टरांची नावं असून पुणे गुन्हे शाखेकडून त्यांचा चौकशी केली जात आहे. डॉ. तावरे हे ससूनच्या फोरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. या दोन्ही डॉक्टरांचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी डॉ. तावरे यांना फोन केला होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

पुणे पोर्श क्रॅश प्रकरण सुरुवातीपासूनच वादात सापडले आहे. ज्यामध्ये आरोपीच्या कुटुंबाला प्राधान्य देणे आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनचा आरोप आहे. अल्कोहोलच्या नशेत पोर्श चालवणाऱ्या या अल्पवयीन मुलाला सुरुवातीला जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु नंतर सार्वजनिक आक्रोशानंतर त्याला ५ जूनपर्यंत निरीक्षण गृहात पाठवण्यात आले. त्याचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर लाच दिल्याचा आरोप आहे. तसंच, त्यांच्या चालकाला धमकावल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही संताप व्यक्त केला आहे. “त्या रात्री अनेकांनी ईमान विकले”, असं ते म्हणाले. “याच ससूनमध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता”, असंही ते म्हणाले.