पुणे : ‘रंगभूमीची प्राथमिक ओळख करून देणाऱ्या माधव वझे यांचे वाचन अफाट होते. पुस्तकांच्या दुकानात वझे नेहमी दिसायचे. त्यांच्या निधनाने रंगभूमीचा गांभीर्याने विचार करणारा रंगकर्मी हरपला,’ अशा शब्दांत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी माधव वझे यांना रविवारी श्रद्धांजली अर्पण केली.जागर संस्थेच्या वतीने माधव वझे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत आळेकर बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, गजानन परांजपे, प्रा. श्याम जोशी, संतसाहित्याचे अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे, ज्येष्ठ समीक्षक रेखा इनामदार-साने, दिग्दर्शक सुनील सुकथनकर या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात ‘कवी जातो तेव्हा…’ या कवी ग्रेस यांच्यावरील कार्यक्रमाचा प्रयोग सादर करण्यात आला.

आळेकर म्हणाले, ‘करमणुकीसाठी आणि गंभीरतेने विचार व्यक्त करणारी असे रंगभूमीचे दोन प्रकार आहेत. नाटक हा अभ्यासाचा भाग आहे. त्याची तालीम करावी लागते. त्यामधील विचार आणि आशयाचे महत्त्व अशा प्राथमिक गोष्टींची जाणीव माधव वझे यांच्यामुळे झाली.’ ‘‘श्यामची आई’ चित्रपटातील श्यामच्या भुमिकेमुळे माधव वझे लहान वयातच लोकप्रिय झाले होते. परखड स्वभावाचे वझे स्पष्टवक्ते होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात काम करतानाचा अनुभव समृद्ध करणारा होता,’ अशी आठवण आळेकर यांनी सांगितली.

‘समीक्षक म्हणून वझे निर्भीड होते. कोणताही संकोच न ठेवता स्पष्टपणे भाष्य करणे, हा त्यांचा स्वभाव विशेष होता.’ असे मत रेखा इनामदार-साने यांनी व्यक्त केले.डॉ. सुनीला गोंधळेकर यांनी सूत्रसंचालन केले. अमित वझे यांनी आभार मानले.