बीआरटी मार्गावर सरावादरम्यान रक्ताची उलटी
माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार व पीएमपी बसचे चालक अनिल सूर्यकांत बोऱ्हाडे (वय ३८, रा. तळेगाव) यांचा बुधवारी रक्ताची उलटी होऊन अचानक मृत्यू झाला. दुपारी बारा वाजता औध-रावेत बीआरटी मार्गावर सराव सुरू असताना त्यांना उलटी झाली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना चारच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
औंध-रावेत मार्गावर बीआरटी बस सुरू करण्यात येणार असल्याने चालकांचा या मार्गावर सराव घेण्यात येत आहे. दुपारी सांगवी फाटा येथे बोऱ्हाडे उभे असताना त्यांना अचानक चक्कर आली व त्याबरोबरच रक्ताची उलटीही झाली. त्यामुळे त्यांना जवळच असलेल्या औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने काही वेळाने त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
तळेगाव येथील माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा १३ जानेवारी २०१० रोजी अज्ञात हल्लेखोरांनी शस्त्राने वार करून खून केला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयमार्फत करण्यात येत आहे. या खून प्रकरणामध्ये बोऱ्हाडे हे मुख्य साक्षीदार होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.