डॉ. नारायण मूर्ती यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयआयटी कानपूर या संस्थेतून संगणकशास्त्रातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले तेव्हा मला आणि माझ्या काही मित्रांना अनेक नामवंत कंपन्यांकडून नोकरीच्या संधी आल्या होत्या. माझ्या मित्रांनी त्या स्वीकारल्या. मात्र त्याच वेळी प्रा. कृष्णाय यांनी त्यांच्या प्रकल्पाबद्दल सांगितले. मी यातील कोणत्या संधीची निवड करावी याबद्दल गोंधळलेला होतो. माझे गुरू मला प्रा. कृष्णाय यांच्यासोबत काम करण्याचा सल्ला देत होते. मात्र तेव्हाच मोठय़ा कंपन्या मला देऊ करत असलेले १६०० रुपये वेतन आणि प्रा. कृष्णाय यांच्याकडे काम करताना मिळणार असलेले निम्मे म्हणजे ८०० रुपये वेतन यातील फरक ठळकपणे जाणवत होता. त्या वेळी प्रा. कृष्णाय यांच्या प्रकल्पात काम करत असताना जे शिकायला मिळेल त्यालाच तू जास्त महत्त्व द्यावेस, असा सल्ला प्रा. सहस्रबुद्धे यांनी मला दिला. त्यांचे ऐकण्याचा निर्णय मी तेव्हा घेतला, मला त्या निर्णयाचा आज ही पश्चात्ताप झालेला नाही. म्हणून भारतीय संस्कृतीतील आचार्य देवो भव हा विचार मला महत्त्वाचा वाटतो अशी कृतज्ञ भावना इन्फोसिस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नारायण मूर्ती यांनी मंगळवारी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा जीवनसाधना गौरव पुरस्कार डॉ. नारायण मूर्ती यांना मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यापीठाचा संगणकशास्त्र विभाग आणि पर्सिस्टंट कम्प्युटिंग इन्स्टिटय़ूटतर्फे आयोजित डॉ. एच. व्ही. सहस्रबुद्धे यांच्या अमृतमहोत्सवासाठी डॉ. मूर्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम आणि डॉ. संजय ढोले उपस्थित होते.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून देण्यात आलेला जीवनसाधना गौरव पुरस्कार हा माझा सन्मान असून त्या सन्मानाला सार्थ ठरविण्यासाठी मी नेहमी मेहनत करेन असे डॉ. मूर्ती या वेळी म्हणाले. डॉ. नारायण मूर्ती आणि त्यांच्या इन्फोसिस फाउंडेशनने संगणक शास्त्रात केलेल्या कामाचा गौरव म्हणून जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा आपल्याला आनंद होत असल्याची भावना कुलगुरू डॉ. करमळकर यांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savitribai phule pune university honored dr narayana murthy
First published on: 28-02-2018 at 02:19 IST