पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील ‘बॅक लॉग’मुळे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्षात प्रवेश घेण्यास पात्र नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेची विशेष संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

या विद्यार्थ्यांना ‘कॅरी फॉरवर्ड’ मिळत नसल्याने सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करून नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाने (एनएसयुआय) गुरुवारी आंदोलन केले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील सर्व विद्यार्थ्यांना ‘कॅरी फॉरवर्ड’ देत असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी आंदोलनस्थळी दिली. त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पदवीच्या पहिल्या वर्षातील काही विषयांत नापास झाल्याने तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळत नाही. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांत ‘बॅक लॉग’ राहिलेल्या विद्यार्थ्यांना ‘कॅरी फॉरवर्ड’ न देण्याच्या नियमामुळे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्षात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे सुमारे ३० हजार ते ४० हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप ‘एनएसयूआय’च्या वतीने करण्यात आला होता. ‘एनएसयूआय’सह काही विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करून विद्यार्थ्यांना ‘कॅरी फॉरवर्ड’ देण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली असून, काही अटी आणि नियमांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना या वर्षी विशेष संधी देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राकरिता, द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्राकरिता, तृतीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचव्या वर्षाच्या नवव्या सत्राकरिता तात्पुरता प्रवेश देण्यात येणार असून, प्रवेश देण्याची पात्रता ही उन्हाळी सत्र परीक्षा २०२४-२५ च्या निकालाऐवजी हिवाळी सत्र परीक्षा २०२५-२६ निकालांवर ठरविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

तात्पुरता प्रवेश अटींसह

तात्पुरता प्रवेश देताना विद्यापीठाने विद्यार्थ्यांना काही अटी घातल्या आहेत. विद्यार्थ्यांनी हमीपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तात्पुरता प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच अभ्यास, प्रात्यक्षिके, सत्रकार्य, क्षेत्रभेट आदी बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. हिवाळी सत्र २०२५-२६ परीक्षेत पुन्हा ‘बॅक लॉग’ लागल्यास तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येणार असून, संबंधित विद्यार्थ्याचे शुल्कही परत मिळणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्राच्या परीक्षांबरोबरच परीक्षा द्यावी लागणार असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.