राहुरी येथे झालेल्या १८ व्या ‘इंद्रधनुष्य २०२२’ महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. विद्यापीठाच्याच अथर्व वैरागकर याला महोत्सवात गोल्डन बॉय पुरस्काराने गौरवण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान येथील झालेल्या या महोत्सवात पुणे विद्यापीठाच्या ४० विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. या संघाने संगीत, साहित्य, ललित कला, नाट्य आणि नृत्य या मुख्य कलाप्रकारांमधील १५ विविध कलाप्रकारांमध्ये आपला ठसा उमटवला. या कलाप्रकारांमधील पारितोषिकांसह विद्यापीठाने महोत्सवातील संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपदही पटकावले.
विद्यापीठाच्या संघाने शास्त्रीय गायन, शास्त्रीय सूरवाद्य, पाश्चात्य एकल गायन, भारतीय समूहगीत, एकांकिका, कोलाज या प्रकारांमध्ये प्रथम पारितोषिक, पाश्चात्य समूह गायन, नाट्य संगीत, वक्तृत्त्व, पोस्टर, रांगोळी या प्रकारांमध्ये द्वितीय, तर शास्त्रीय तालवाद्य, पाश्चात्य तालवाद्य, स्पॉट पेंटिंग, इन्स्टॉलेशन या प्रकारांमध्ये तृतीय पारितोषिक पटकावले.