सत्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे दुसरे पुष्प. आजच्या स्वरमहोत्सवाची सुरुवात पं. रितेश व पं. रजनीश मिश्रा यांच्या घरंदाज गायकीने झाली. सर्वप्रथम सादरीकरणासाठी त्यांनी मुलतानी हा ख्याल निवडला. विलंबित एकतालातील ‘गोकुल गाँव का छोरा’ ही पारंपरिक बंदिश ठाय लयीत सादर केली. शंखासाखा गंभीर स्वर, देखणे, ओजस्वी व्यक्तिमत्त्व, जसे सामवेद ते बाळ बोलती या गदिमांच्या गीतरामायणामधील लव-कुशांच्या गायनाच्या वर्णनाची आठवण यावी. ही जुगलबंदी नसून सहगायन चालले होते. ज्या स्वरावर न्यास केला, त्याच स्वरापासून पुढला स्वरविचार दुसरा सहगायक सुरू करी. त्यामुळे स्वरविचारात कुठेही खंड, तुटकपणा नव्हता. एकसंध असे देखणे गायन दोन गायक असूनही ऐकावयास मिळणे हा दैवदुर्लभ योग पुण्याच्या या रसिकांच्या नशिबी होता. गमकेचे बहुतांशी प्रकार, बोल-ताना यांनी विलंबित दाद देऊन गेले. द्रुतात एक तराणा, तसेच द्रुत एकतालात ‘आनन मे नंदलाल’ ही बंदिश त्यांनी सादर केली. यानंतर ‘मधुवंती’मधील ‘उन सन लगन लागी रे’ ही त्रितालातील बंदिश मध्यलयीत सादर केली. शेवटी रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव ‘सूर संगम’ या चित्रपटातील पं. राजन-साजन मिश्रा यांनी अजरामर केलेले ‘किरवाणी’ रागावर आधारित ‘साध रे, सूर को साध रे’ हे गीत मोठी दाद देऊन गेले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawai gandharva bhimsen mahotsav
First published on: 09-12-2016 at 03:51 IST