संगीताच्या आविष्कारासाठी श्रुतींचा मुळातून अभ्यास करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ संवादिनीवादक डॉ. अरविंद थत्ते यांनी शनिवारी व्यक्त केले.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील अंतरंग उपक्रमांतर्गत ‘श्रुतींची संख्या किती’ या विषयावर डॉ. थत्ते यांचे व्याख्यान झाले. ‘लोकसत्ता’ या उपक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.
डॉ. थत्ते म्हणाले, संगीत शास्त्रामध्ये दोन स्वरांमध्ये असलेल्या २२ श्रुतींचा उल्लेख भरताने केला आहे. मात्र, त्यानंतरच्या काळातील आविष्कार आणि रागसंगीताचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांची संख्या २२ हून कितीतरी अधिक आहे हे लक्षात आले. या सर्व श्रुतींचा उपयोग गायनात आणि वादनात अजाणतेपणानेही होताना दिसतो. मात्र, तो डोळसपणे केल्यास कलेच्या आविष्कारातील बंदिस्तपणा अधिक उठावदार होईल. या बाबीचा संगीताच्या मानकीकरणात अधिक उपयोग होऊ शकेल. श्रुतीगायन करणाऱ्या गायकांकडे श्रुती किती आणि कोणत्या हे नेमकेपणाने सांगण्याचे सामथ्र्य नसते. सुरेल गायक १२ श्रुतींमध्येच गातात. मात्र, त्याभोवताली असलेल्या श्रुतींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होत नाही. अनेकांच्या गायन-वादनाचा २२ श्रुतींशी संबंध असतो का असाही प्रश्न उपस्थित होतो.
 उलगडला विदुषीचा प्रवास
बनारस घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गिरिजा देवी यांच्या कथनातून संगीत क्षेत्रातील विदुषीचा प्रवास उलगडला. महोत्सवातील ‘षड्ज’ उपक्रमांतर्गत बिजॉय चटर्जी दिग्दर्शित ‘गिरिजा देवी’ आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘श्रुती अँड ग्रेस इन इंडियन म्युझिक’ हे लघुपट दाखविण्यात आले. गंगा किनाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर गिरिजा देवी यांच्या मनोगतातून वडिलांकडून मिळालेले संगीताचे शिक्षण, पं. सरजूप्रसाद मिश्र आणि पं. शिवचरणजी यांच्याकडून मिळालेली तालीम, १९४९ मध्ये आकाशवाणी कलाकार म्हणून झालेली निवड, देश-विदेशातील मैफली आणि संगीत रिसर्च अ‍ॅकॅडमीच्या गुरू ही त्यांची वाटचाल उलगडली. ‘रस के भरे तोरे नैन’, ‘पूबर मत जईयो मोरे राजाजी’, ‘पिया नहीं आये काली बदरिया बरसे’, ‘मियाँ नजरे नहीं आंदा’ या ठुमरींचे गायन पडद्यावर पाहता आले. श्रुती या लघुपटातून राधा-कृष्णाच्या लीला आणि निसर्गाच्या चित्रमालिकेसह पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाची अनोखी मैफल अनुभवता आली.