पुणे : राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठीची अंतिम गुणवत्ता यादी राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) गुरुवारी (२४ जुलै) जाहीर करण्यात येणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, प्रवेश घेण्यासाठी १३ सप्टेंबर ही अंतिम मुदत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २ लाख १३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अंतरिम गुणवत्ता यादी १९ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी, पालकांचे लक्ष अंतिम गुणवत्ता यादी आणि पुढील प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २६ ते २८ जुलै या कालावधीत महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत. तर पहिल्या फेरीची निवडयादी ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ४ ऑगस्ट रोजी दुसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत.
५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीचे पसंतीक्रम नोंदवल्यानंतर ११ ऑगस्ट रोजी दुसऱ्या फेरीची अंतरिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी तिसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतर १७ ते १९ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्यात आल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी तिसऱ्या फेरीची निवडयादी जाहीर केली जाणार आहे, तर २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. २६ ऑगस्ट रोजी चौथ्या फेरीसाठीच्या रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत. २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे, १ सप्टेंबर रोजी चौथ्या फेरीची निवडयादी जाहीर करणे, तर २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी ११ सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्काचा परतावा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी घेण्यासाठीची अंतिम मुदत, तर महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्यासाठी १३ सप्टेंबरपर्यंतची मुदत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.