पुणे : राज्यभरातील शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनी झेंडावंदन केले जाते. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातात. मात्र, यंदाच्या स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी राज्यातील शाळांना अधिकचे काम करावे लागणार आहे. समर्पक पेहराव करून, देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कवायतींचे सादरीकरण आयोजित करण्याचे निर्देश लागणार आहेत. त्याशिवाय १४ ऑगस्ट रोजी आणखी एक उपक्रम सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना ३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात प्रभात फेरी, भाषण स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, खेळ अशा विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. त्याच धर्तीवर, आता स्वातंत्र्य दिनी राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये झेंडावंनदनानंतर विद्यार्थ्यांचे कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालकांना कवायतींच्या आयोजनाबाबत परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळींवर आधारित कवायत स्वातंत्र्य दिनी शाळांमध्ये किमान २० मिनिटे कालावधीचे कार्यक्रम आयोजित करावेत. कवायतीमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असावा. या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आताही शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनी झेंडावंदनासह उपक्रम आयोजित केले जातात. त्यात प्रभात फेरी, देशभक्तीपर व्याख्याने, समूहगीते असे कार्यक्रम, तसेच पारितोषिक वितरण, खाऊ वाटप असे उपक्रम होतात. आता त्यात कवायतींचीही भर पडली आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकच नाहीत. त्यामुळे असलेल्याच शिक्षकांना कवायत शिकवण्याचेही काम करावे लागणार आहे, असे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी सांगितले.
सन २०२५ हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष (७५०वे) आहे. येत्या १५ ऑगस्ट या रोजी गोकुळाष्टमीस संतश्रेष्ठ ज्ञानदेवांची ७५०वी जयंती आहे. त्यामुळे १४ ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत पसायदान म्हणावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, प्रत्येक शाळेत पसायदान म्हणण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्याबाबत शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी शिक्षण आयुक्तांना दिलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.