पुणे : खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) साहाय्याने वृश्चिक नक्षत्रातील तारकासमूहातील एका स्पंदकाचा (पल्सार) शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे. नव्याने शोधलेला ‘पीएसआरजे १६१७-२२५८ए’ हा मिलिसेकंद स्पंदक असून, या स्पंदकाद्वारे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताची चाचणी घेणे शक्य होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ‘ग्लोब्युलर क्लस्टर्स जीएमआरटी पल्सार सर्च’ (जीसीजीपीएस) या आंतरराष्ट्रीय प्रकल्पातील हा पहिला शोध आहे.
राष्ट्रीय रेडिओ आणि खगोलभौतिकी केंद्रासह (एनसीआरए) ज्योतिर्मय दास, जयंत रॉय, भास्वती भट्टाचार्य यांचा या संशोधक गटात सहभाग आहे. ‘जीसीजीपीएस’ या प्रकल्पात एनसीआरए, जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर रेडिओ ॲस्ट्रोनॉमी, अमेरिकेतील नॅशनल रेडिओ ॲस्ट्रोनॉमी ऑब्झर्व्हेटरी, यूकेतील ऑक्सफर्ड विद्यापीठ यांचा समावेश आहे. या संशोधनाचा शोधनिबंध ‘ॲस्ट्रॉनॉमिकल जर्नल’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. खगोलशास्त्रज्ञांच्या गटाने ‘जीएमआरटी’तील अद्ययावत इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर करून नव्या स्पंदकाचा शोध घेतला. हा स्पंदक वृश्चिक नक्षत्रातील ‘मेसियर ८० एनजीसी ६०९३’नामक तारकासमूहात आहे.
स्पंदक किंवा पल्सारची निर्मिती ताऱ्याच्या महास्फोटातून होते. स्वतःभोवती सेकंदाला २३२ वेळा फिरणारा हा स्पंदक तारकासमूहाच्या केंद्रापासून त्रिज्येच्या दिशेला त्रिज्येच्या केवळ तीन चतुर्थांश अंतरावर आहे. ज्योतिर्मय दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मिलिसेकंद स्पंदक हे साधारण लहान शहराच्या आकाराचे तारकीय अवशेष आहेत. ते प्रतिसेकंद शेकडो वेळा फिरतात.
अंतराळातील दीपगृहांसारखे फिरत हे स्पंदक अवकाशात रेडिओ किरणे पसरवतात. ‘जीसीजीपीएस’ प्रकल्पातून नवीन शोधलेला मिलिसेकंद स्पंदक अंदाजे दर १९ तासांनी एका लहान साथीदाराभोवती फिरतो. मात्र, एका व्यवस्थित वर्तुळाऐवजी, त्याचा मार्ग एका लंबवर्तुळाकृती कक्षेत पसरलेला आहे. त्यामुळे तो खगोलीय प्रणालीच्या दृष्टीने वेगळा आहे.’
तारकासमूहांच्या गोलाकार गर्दीत गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव अशा कक्षांना विचित्र आकार देऊ शकतो. त्यातून ‘पीएसआरजे १६१७-२२५८ए’सारखी प्रणाली तयार होते. या स्पंदकाची लंबवर्तुळाकार कक्षा प्रदीर्घ असल्यामुळे अवकाशात हळूहळू फिरताना दिसत आहे. ही घडामोड आइन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धान्तानुसार अवकाशकालीन वक्रतेमुळे घडत आहे. या वक्रतेतील फरकाला ‘पेरियास्ट्रॉन गती’ म्हणतात.
ही अचूकता प्रतिवर्ष सुमारे अर्धा अंश आहे. त्या दृष्टिकोनातून, या स्पंदकाची कक्षा एका दिवसात बुध ग्रहाच्या सूर्याच्या भोवतालच्या (पेरिहेलियन) संपूर्ण दशकात जितकी बदलते तितकीच बदलते. त्या अचूक मापनामुळे खगोलशास्त्रज्ञांना खगोलीय घटकांचे वजन करता येते. एकत्रितपणे हा स्पंदक आणि त्याच्या साथीदाराचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानापेक्षा सुमारे १.६७ पट जास्त आहे.
‘जीएमआरटी’द्वारे सततच्या निरीक्षणांतून स्पंदकाच्या वस्तुमानासंदर्भातील अंदाज अधिक स्पष्ट होऊ शकतात. अतिरिक्त सापेक्षतावादी वैचित्र्य आढळू शकते. त्यामुळे आइन्स्टाईन यांच्या सिद्धान्ताच्या नवीन चाचण्या आणि गोलाकार समूहांतील तारकीय चकमकी स्पंदक संशोधनाला कसे आकार देतात याचे नवीन संकेत मिळू शकतात. – भास्वती भट्टाचार्य, संशोधक