आकर्षक सजावटींच्या माध्यमातून सहा दशकांहून अधिक काळ पुण्याच्या गणेशोत्सवाला वैभव प्राप्त करून देणारे कलाकार, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे कला दिग्दर्शक आणि तुळशीबाग मंडळाच्या गणपतीची भव्य अशी देखणी फायबर ग्लासमधील मूर्ती घडविणारे ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार दत्तात्रय श्रीधर ऊर्फ डी. एस. खटावकर (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर हे त्यांचे चिरंजीव होत.
गेल्या वर्षभरापासून खटावकर आजारी होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शुक्रवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. खटावकर यांचे पार्थिव सायंकाळी तुळशीबाग मंडळ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर रात्री वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डी. एस. खटावकर यांचा जन्म ४ एप्रिल १९२९ रोजी झाला. शालेय शिक्षण जेमतेम असले तरी जीवनाच्या शाळेमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (नाना वाडा) असताना १९४२ च्या चले जाव क्रांतीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. चित्रकला आणि मातीकाम करण्याचा छंद लहानपणापासूनच असल्याने इंग्रजी पाचवीमध्ये असताना त्यांनी शाळा सोडली. १९४६ मध्ये कला शिक्षण घेण्यासाठी त्यांनी इन्स्टिटय़ूट ऑफ मॉडर्न आर्ट म्हणजेच सध्याच्या अभिनव कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. मुंबई येथील जे. जे. कला महाविद्यालय या परीक्षा केंद्रातून ते उच्च कला परीक्षा उत्तीर्ण झाले. चित्रकला हा विषय घेऊन त्यांनी फाईन आर्ट पदविका संपादन केली. तर, १९५४ मध्ये आर्ट मास्तर ही परीक्षा उत्तीर्ण झाले. लोणी काळभोर येथील अध्यापक महाविद्यालयामध्ये त्यांनी कलाध्यापक म्हणून तीन वर्षे अर्धवेळ काम केले. आगरकर मुलींचे हायस्कूल येथे १९५६ ते १९६३ या कालावधीत कलाध्यापक म्हणून काम केल्यानंतर ऑगस्ट १९६३ मध्ये ते अभिनव कला महाविद्यालयामध्ये रूजू झाले. ड्रॉईंग आणि पेंटिंग विभाग, उपयोजित कला विभाग, आर्ट टीचर्स डिप्लोमा विभाग, विविध छंद विभाग यामध्ये भरपूर परिश्रम घेऊन प्रसंगी पदरमोड करून निरपेक्ष वृत्तीने विद्यादान करीत त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शनच केले नाही तर, अनेक कलाकार घडविले. उपप्राचार्य म्हणून ते १९८९ मध्ये सेवानिवृत्त झाले.
तुळशीबाग मंडळासाठी मातीचा गणपती करून १९५२ मध्ये खटावकर यांच्या कला कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. गेली सहा दशके तुळशीबाग मंडळाच्या सजावटीचे काम करून खटावकर यांनी पुणेकरांना नावीन्यपूर्ण पीैराणिक देखाव्यांचे दर्शन घडविले. शताब्दी पूर्ण केलेल्या विविध गणेश मंडळांच्या सजावटी आणि चित्ररथाची निर्मिती खटावकर यांनी केली होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी निर्मिती केलेल्या ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे कला दिग्दर्शन खटावकर यांनी केले. पाच वर्षांच्या कठोर परिश्रमाने १५ एप्रिल १९८५ रोजी जाणता राजा महानाटय़ाचा पहिला प्रयोग झाल्यावर रसिकांनी खटावकर यांच्या कलाविष्काराची प्रशंसा केली. निवृत्तीनंतर कलासाधनेमध्येच वेळ व्यतीत करणाऱ्या खटावकर यांनी भारती विद्यापीठामध्ये भारती कला महाविद्यालयाची स्थापना केली. प्राचार्य म्हणून काम पाहताना त्यांनी ही संस्था नावारूपाला आणली. तुळशीबाग मंडळाची हेमाडपंती भव्य आणि देखणी फायबर ग्लासमधील मूर्ती खटावकर यांनी घडविली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या राष्ट्रीय सजावट स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांनी अखेपर्यंत काम पाहिले. वास्तु-शिल्पाचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी देशात आणि परदेशात प्रवास करून तशी हुबेहूब शिल्पे गणेशोत्सवामध्ये साकारली होती.